भोलावडे ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे भोर – भोलावडे (ता. भोर) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गात नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असून झालेल्या कामातील बुवासाहेब वाडी येथील पाण्याची टाकी, फिल्टर प्लान्टचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. या सर्वाची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सरपंच प्रवीण जगदाळे यांनी केली असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस सरपंच प्रवीण जगदाळे यांसह उपसरपंच अविनाश आवाळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आवाळे, प्रशांत पडवळ, ज्ञानेश्वर तारू, तंटामुक्तीचे अध्यक्ष गजानन आवाळे उपस्थित होते. भोलावडेची लोकसंख्या 7 हजार 500 असून, गणेशनगर, निर्मल नगर, कान्हेगुरुजी नगर, बुवासाहेब वाडी, गावठाणसाठी साडेतीन लाख लिटर पाणी रोज लागते . राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 4 कोटी 69 लाख रुपये खर्चाची योजना 2018 मध्ये मंजूर झाली. यामध्ये दोन पाणी साठवण टाक्या 50 हजार, 25 लिटर, फिल्टर प्लान्ट, वितरण 8 इंची लाइन 2125 मीटर, 4 इंची पाइपलाइन 4 हजार 30 मीटर, 3 इंची पाइपलाइन, 745 मीटर अडीच इंची पाइपलाइन 260 मीटर, 2 इंची पाइपलाइन 9360 मीटर आहे. यातील बुवासाहेब वाडी येथील फिल्टर प्लान्टचे काम निकृष्ट आहे, तर पाण्याची टाकीला गळती आहे.अंतर्गत वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र पाण्याची टेस्टिंग केलेली नाही, त्यामुळे गळती आहे किंवा नाही हे समजत नाही. ही योजना ठेकेदाराने पाच वर्षे होऊनही अद्याप ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली नाही. या कामाचे पैसे ठेकेदाराला दिले का नाही माहिती नसून काम अपूर्ण असून झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ठेकेदाराला कामाचे पैसे देऊ नये. वारंवार जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना तोंडी-लेखी तक्रार करून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे सरपंच प्रवीण जगदाळे यांनी सांगितले. या योजनेची पाण्याची टाकी, पाइपलाइचे काम 90 टक्के पूर्ण झालेले असून फिल्टरचे काम सुरू आहे. पाइपमधून व टाकीत पाणी सोडून पाण्याची चाचणी करून एक महिन्यात काम पूर्ण करून ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. – बी. जी. नलावडे, ठेकेदार