Pune District : करंदीतील डोंगराला रात्रीत भीषण वणवा

शिक्रापूर : करंदी (ता. शिरुर) येथील डोंगराला रात्रीच्या वेळी वणवा लागून भीषण आग लागली. आगीमध्ये झाडांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. मात्र, स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला आहे.
करंदी येथे (दि.१३) जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास अचानकपणे आग लागली. काही वेळात आगीने रौद्ररुप धारण केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. सामाजिक कार्यकर्ते राघू नप्ते, गोविंद नप्ते, राजेंद्र ठाकर, रमेश नप्ते, बाळूनाना ठाकर, संदीप ठाकर यांसह आदींनी झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने भर अंधारात आगीवर आगीवर नियंत्रण आणले.
नागरिकांच्या तब्बल दीड तासांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली असल्याने सुदैवाने अनर्थ टळला. आगीमध्ये झाडांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागाने जंगलातील वणवे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ व नागरिक करीत आहेत.





