Pune District : सावन का महिना…;उत्तर भारतीयांची भीमाशंकरला दर्शनासाठी गर्दी

मंचर – उत्तर भारतीयांचा सावन (श्रावण) महिना सुरू झाल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी उत्तर भारतीय राज्यातील हिंदू भाविक भक्त दर्शनासाठी येऊ लागले असून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पर्यटक, भाविक भक्तांची गर्दी वाढली आहे.
15 दिवस अगोदर उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरू होत असल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकरसह देशभरातील बारा ज्योतिर्लिंग ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. उत्तर भारतात मुख्यत्वे करून जम्मू-काश्मीर, लढाख, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांचा समावेश होत असून उत्तर भारतीयांची तिथी ही पौर्णिमा असते व त्यांच्या पंचांगानुसार त्यांचा श्रावण महिना हा 15 दिवस अगोदर सुरू होत असतो.
यावर्षी त्यांचा श्रावण महिना शुक्रवारी (दि. 11) सुरू झाला असून त्याची समाप्ती 9 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पहिल्याच सोमवारी (दि. 14) उत्तर भारतीयांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. तर महाराष्ट्रात अमावस्या तिथीनुसार मोजणी होते. त्यामुळे पंचांगानुसार महाराष्ट्रात श्रावण महिना हा शुक्रवारी (दि. 25) सुरू होणार असून तो 23 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
श्रावण महिना हा हिंदू बांधवांसाठी पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात श्रावणी सोमवार चार येणार असून या महिन्यात भगवान शंकराची पूजा करणे, शिव मंदिरात दर्शन घेणे, व्रत करणे, अभिषेक करणे, उपवास करणे याला विशेष महत्त्व आहे.





