पुणे जिल्हा : श्री विघ्नहर कारखान्याचा ३२०० रुपये बाजारभाव जाहीर

श्री विघ्नहरचीवार्षिक सर्वसाधारण सभासंपन्न
ओझर : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ४२ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळींच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेस मोठ्या संख्येने सभासद बंधू-भगीणी उपस्थित होते. सभेचे कामकाज होण्यापूर्वी श्री विघ्नहर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. निवृत्तीशेठ नामदेव शेरकर व स्व. सोपानशेठ नामदेव शेरकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. सभेच्या सुरुवातीस सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी केले.
प्रस्ताविक करत असताना चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी मागील सन २०२३-२४ गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या ऊसाला ३२०० रु -प्रति मे.टन विनाकपात बाजार भाव जाहीर केल्यामुळे सभासद, ऊस उत्पादक यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्याच बरोबर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाविषयी चेअरमन सत्यशिल शेरकर त्यांनी सविस्तर माहीती दिली.
मागील गाळप हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी, एकरी १११ टनापेक्षा जास्त उत्पादन घेतलेले शेतकरी, जास्तीत जास्त ऊस तोडणी व ऊस वाहतूक करणारे कंत्राटदार, हार्वेस्टरने जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे कंत्राटदार, एकरी १०० टनापुढील उत्पादन घेणारे शेतकरी यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देवून सत्कार करण्यात आला. यावेळी एकरी १३६ मे.टन ऊस उत्पादन घेणारे उल्हास जेजुरकर यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
मागील वर्षी इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले. तसेच ४० वर्षापूर्वीच्या मशिनरीचा मेंटेनन्स मोठया प्रमाणावर वाढलेने या वर्षी कारखान्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प सर्वांच्या सहकार्याने पुर्ण करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असल्याचे सत्यशिल शेरकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय उपस्थित सभासदांनी उर्त्स्फूतपणे एकमताने मंजूर केले. कारखान्याच्या कामकाजाविषयी बोलताना अनेक सभासदांनी चेअरमन सत्यशिल शेरकर व संचालक मंडळाचे तोंड भरुन कौतुक करताना चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्ठ व पारदर्शक कामकाज सुरु असल्याचे सभासदांनी बोलून दाखविले. यावेळी बहुसंख्य सभासदांनी प्रश्न विचारुन सभेच्या चर्चेत सहभाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी योग्य उत्तरे दिल्याने सभासदांचे समाधान व्यक्त केले.
कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ-कोऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्लीचा गळीत हंगाम २०२२-२३ साठीचा उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार कारखान्यास मिळाल्या बद्दल सभासदांच्या वतीने अभिजित बढे व विकास चव्हाण यांनी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी केले. दुःखवट्याचा ठराव सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी मांडला तर उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.





