Pune District : तीव्र उन्हामुळे पिके वाचविण्याची भ्रांत

राहू : उन्हाळा लागला की नोकर वर्गांचे थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकचे प्लॅन चालू होतात. परंतु शेती प्रधान असलेल्या आपल्या देशात उन्हाळा लागला की शेतकर्याला कळा चालू होतात व आपले पीक कसे वाचवता येईल याची भ्रांत शेतकर्याला पडते.
या वर्षी मार्च मध्येच सूर्यदेव आग ओकू लागला आहे. त्यामुळे शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे. नदीत पाणी आहे; परंतु पिकाला पाणी देता येत नाही, अशी परिस्थिती होत आहे. यामध्ये विज उपलब्ध नाही असे नाही; परंतु अनेक तांत्रिक अडचणीमुळे ओव्हर लोडमुळे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) जाळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे पिके पाण्यावाचून होरपळून जात आहे. वीज मंडळ देखील आपल्या परीने सहकार्य करत आहे; परंतु अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा कमी पडत असल्याने महावितरण देखील हतबल होताना दिसून येत आहे.
राहू व बेट परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने वीज उपलब्ध होत असल्याने रोहित्र, पंप जळण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यातच आकडे बहाद्दर आपले कोणी वाकडे करू शकत नाही, या आविर्भावात वीज चोरून वापरत आहेत; परंतु त्याचा फटका प्रामाणिक ग्राहकांना बसत आहे. ओव्हरलोडमुळे एखादे रोहित्र जळल्यास त्याच्या शेजारच्या रोहित्रवर अनिधिकृत पणे आकडा टाकून वीज घेतली जाते; परंतु थोड्याच कालावधीत तो रोहित्र देखील ओव्हर लोडमुळे जळतो व त्या ठिकाणी प्रामाणिक ग्राहकाला मोठे नुकसान सोसावे लागते.
साखर कारखाना बंद झाल्यास
साखर कारखान्यांचा हंगाम चालू असताना को जनरेशनमुळे अतिरिक्त वीज ही हे कारखाने वीज मंडळाला विकतात. त्यामुळे कारखाने सुरू असताना काही प्रमणात का होइना चांगल्या दाबाने वीज मिळते; परंतु आज कारखाने ऊस कमी असल्यामुळे पूर्ण क्षमतेने चालत नाही, तर ही परिस्थिती. तर उद्या कारखाने बंद झाल्यावर काय होईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.





