पुणे जिल्हा : आश्वासनावर तरडोलीतील उपोषण मागे

“दुधाला 40 रुपये दर मिळावा’ यासाठी सहा दिवसांपासून सुरू होते शेतकऱ्याचे उपोषण
मोरगाव – दूध दरवाढीबाबत सागर पंडीत जाधव यांनी तरडोली (ता. बारामती) येथे सुरू केलेले उपोषण शनिवारी (दि. 7) सातव्या दिवशी बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी उपोषणकर्ते सागर जाधव यांनी केलेल्या मागण्यांनबाबत आश्वासित केल्यानंतर त्यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले.
सागर जाधव यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला 40 रुपये दर मिळावा यासाठी उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी (दि. 6) तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्ता रोको केला होता. तसेच पुणे-बारामती रस्त्यावर दूध ओतून तिव्र निषेध व्यक्त केला होता. तर शनिवारी सातव्या दिवशी दुपारी 1 वाजता तहसीलदार शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्ते जाधव व उपस्थित शेतकऱ्यांनाबरोबर चर्चा केली.
यावेळी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समीती माजी प्रशासक दिलीप खैरे, पंचायत समिती माजी सदस्य राहुल भापकर, सुपाचे पोलीस नागनाथ पाटील, माजी सरपंच नवनाथ जगदाळे, महेंद्र तांबे, सतीश गायकवाड, आश्विनी गाडे, स्वाती गायकवाड, अनिल कदम, शरद भापकर, बाळासाहेब भापकर आदी उपस्थित होते.
दूध दर वाढीबाबत शासन दरबारी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार आहे. तसेच पाझर तलावात पाणी सोडणे यांसह इतर तालुका पातळीवरचे विषय तात्काळ सोडवणार आहे.
– गणेश शिंदे, तहसीलदार,बारामती
उपस्थित शेतकऱ्यांच्या समोर तहसीलदारांनी दूध दरवाढीबाबत शासन दरबारी पाठपुरावा कारणार असल्याचे सांगितले. यावर मी विश्वास ठेऊन उपोषण सोडत असून येत्या 30 तारखेपर्यंत दूध दरवाढ न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडणार आहे.
– सागर जाधव, उपोषणकर्ते





