पुणे जिल्हा : वारुळवाडीतील बेघरांना मिळणार हक्काचे घर

शबरी आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या घरांच्या कामाचे भूमिपूजन
नारायणगाव – वारुळवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतच्या माध्यमातून 2022-23 अंतर्गत मंजूर झालेल्या शबरी आवास योजनेंतर्गत बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार आहे.
या घरांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पंचायत समिती जुन्नरचे गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, सरपंच राजेंद्र मेहेर, सदस्य प्रकाश भालेकर, नारायण दुधाने, तंटामुक्ती अध्यक्ष राहुल फुलसुंदर, उपाध्यक्ष शांताराम पारधी, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, लाभार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी घरकुल लाभार्थी भालचंद्र श्रीपत कडाळे, शरद कडाळे, विकास दुधाने, विकास जाधव व कैलास दुधाने, कडाळे व ठाकरवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
“सर्वांसाठी घरे 2024′ राज्यशासनाचे धोरण असून राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबववण्यात येत आहे. त्यातीलच शबरी आवास योजना आदिवासी जमातीसाठी असून पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी 1 लाख 50 हजारांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते.
योजनाअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना किमान 269 चौ.फुट क्षेत्राचे बांधकाम करणे आवश्यक असते. सरपंच राजेंद्र मेहेर यांनी उर्वरित सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ दिला जाणार असून घरकुल मंजूर झालेल्यांनी आपल्या घरकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे सांगितले.





