पुणे जिल्हा : शेतकऱ्याचा मुलगा अर्थकुंडली तपासणार

सीए परीक्षेत इनामगावचा शशिकांत घाडगे यांचे यश
मांडवगण फराटा – इनामगाव (ता. शिरूर) येथील शेतकरी कुटुंबातील शशिकांत दत्तात्रेय घाडगे या जिद्दी तरुणाने सनदी लेखापाल होण्याचे स्वप्न साकारले. जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम, सातत्याच्या बळावर शशिकांत घाडगे याने यश खेचून आणले.
शशिकांत हे सनदी लेखापाल परीक्षेत उर्तीर्ण झाले आहेत. शशिकांत यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे घाडगे वस्तीवरीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत गिरविले. माध्यमिक शिक्षण इनामगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. बारावीपर्यंतचे शिक्षण श्रीगोंद्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयात पुणे केले.
पदवीची पहिली दोन वर्षे शिरूरच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात तर शेवटचे वर्ष पुण्यातील एस. पी कॉलेजमध्ये शिकून ते पदवीधर झाले. त्याचदरम्यान सनदी लेखापालचे धडेही त्यांनी गिरविले. इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) ने घेतलेल्या परीक्षेतून त्यांनी आपले सनदी लेखापाल होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले आहे. 2013 पासून तीन टप्प्यांत झालेल्या परीक्षेत खडतर परिश्रमातून त्यांनी हे यश संपादन केले आहे.
प्रेरणा, प्रोत्साहनाच्या बळावर यश
सनदी लेखापाल होण्यासाठी सीए सुनील यल्लोळ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत ढवण, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर, शिवाजी आव्हाड, प्रा. योगेश भुजबळ, प्रा. सुधीर शिंदे, विकास चत्तर, किरण घाडगे आदी सहकाऱ्यांनीही वेळोवेळी प्रेरणा व प्रोत्साहन देत सर्वतोपरी सहकार्य केले. इनामगाव परिसरातील पहिला सीए (सनदी लेखापाल) होण्याचा मान शशिकांत घाडगे यांनी मिळविला आहे. शशिकांत हे इनामगावच्या सरपंच पल्लवी संजय घाडगे यांचा पुतण्या आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा सनदी लेखापाल झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





