Pune District : धर्मांतरांविरोधात सकल हिंदू समाजाचा एल्गार ; शिरूरमध्ये मोर्चा

धर्मांतरबंदी कायद्याची जोरदार मागणी
शिरूर – सांगली येथील यशवंतनगरमधील गर्भवती महिलेच्या धर्मांतरणाच्या दबावाखाली आत्महत्येच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर व शिरूर तालुक्यातील वाढत्या धर्मांतराच्या घटनांना विरोध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरूर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महिलांचा लक्षणीय सहभाग मोर्चात दिसून आला. कार्यकर्ते जुन्या पुणे-अहिल्यानगर मार्गे मोर्चा काढत शिरूर तहसील कार्यालयावर दाखल झाले. शिरूर तहसील कार्यालयात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना निवेदन दिले. सभेत आमदार महेश लांडगे, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे, भाजप प्रदेश सचिव ॲड. वर्षा डहाळे, नानाजी पडळकर आदी मान्यवरांनी विचार मांडले.
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवणार आहे. हा कायदा कडक असावा व देशातील इतर राज्यांनाही प्रेरणा मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.
ॲड. वर्षा डहाळे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करत महिला आयोगाने अजूनही कोणतीही दखल घेतलेली नाही. महिला आयोग झोपेत आहे का, असा थेट सवाल उपस्थित केला.
या मोर्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, शिवबा संघटना, सकल हिंदू समाज, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सभेचे प्रास्ताविक नामदेव घावटे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले. संग्राम भंडारी यांनी आभार मानले.





