Pune District: श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

भवानीनगर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 7 एप्रिल 2025 पासून इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
दि. 7 ते 15 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्रे मिळणार असून ती स्वीकृत देखील करण्यात येणार आहेत. सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्रे वाटप व स्वीकृत करण्यात येणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेल्या नामनिर्देशनाची यादी 7 एप्रिल पासून ते 15 एप्रिल अखेरपर्यंत जसजशी प्राप्त होतील त्याप्रमाणे रोज सकाळी चार नंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्जाची छाननी 16 एप्रिल रोजी सकाळी 11 ते छाननी संपेपर्यंत करण्यात येणार आहे.
वैध नामनिर्देशनाची यादी 17 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दोन मेपर्यंत सकाळी 11 ते दुपारी तीन अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक लढविणार्या अंतिम उमेदवारांची यादी पाच मे रोजी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात येईल. तदान 18 मे रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे व मतमोजणी दुसर्या दिवशी लगेच 19 मे रोजी सकाळी नऊ ते मतमोजणी संपेपर्यंत होणार आहे व याच दिवशी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.
21 जागांसाठी निवडणूक
श्री छत्रपती कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक 21 जागांसाठी होत असून गट क्रमांक एक लासुर्णे मधून दोन जागा, गट क्रमांक दोन सणसर मधून दोन जागा, गट क्रमांक तीन उद्धट मधून दोन जागा, गट क्रमांक चार अंथुर्णे मधून तीन जागा, गट क्रमांक पाच सोनगाव मधून तीन जागा, गट क्रमांक सहा गुणवडीमधून तीन जागा ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणनमधून एक जागा, अनुसूचित जाती जमाती मधून एक जागा, महिला राखीव प्रतिनिधी मधून दोन जागा, इतर मागास प्रवर्गातून एक जागा, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मधून एक जागा असे एकूण 21 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.





