पुणे जिल्हा : राजकीय पंढरीतील फलकाने लक्ष वेधले

बारामतीत फलकावर संपूर्ण पवार कुटुंबीयांची छबी
जळोची – राजकारणाच्या दृष्टीने बारामती दोन गटांत विभागली असली तरी बारामतीकरांसाठी मात्र सारेच सारखे आहेत. असाच काहीसा हा संदेश देणारा एक फलक तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या निमित्ताने बारामती शहरात उभा करण्यात आला आहे. राजकारण्यांच्या पंढरीत तुमचे स्वागत असं… वारकऱ्यांचे स्वागत करताना या फलकावर सर्वच पवार कुटुंबाचे फोटो एकत्रित छापण्यात आले आहेत. त्यामुळे या स्वागत फलकाने संपूर्ण बारामतीकरांचे लक्ष वेधून घेतले.
बारामतीतील देशमुख चौकात उभारलेल्या या फलकाने सकाळी सर्वांचे लक्ष वेधल्यानंतर चर्चेला उधाण आले. ८ नंबर बॉईज नावाच्या ग्रुपने हा फलक उभा केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार यांची छायाचित्रे फलकावर एकत्रित प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये राजकारणाच्या पंढरीत वारकरी भक्तांचे स्वागत, अशा स्वरूपाची मांडणी केली आहे.
बारामतीकरांच्या मनातलं हे स्वप्न की सारे एकत्र असावेत. सध्या ते विभागले गेले असले तरी सामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टीने की, जे दोन्ही गटांत विभागले गेलेले नाहीत. अशांसाठी मात्र हे सगळेच सारखे. त्यामुळे सर्वांचा एकत्रित फोटो प्रसिद्ध करून राजकारणाच्या पंढरीत तुमचे स्वागत अशा स्वरूपाचा हा फलक उभा केला आहे.
बारामतीची ओळख पवारांचीच
बारामती म्हटलं की, ती कविवर्य मोरपंथांची बारामती, बारामती म्हटलं की ती देशातील आणि राजकारणातील राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेली बारामती..असे म्हटले जाते. एकूणच देशाच्या किंवा राजाच्या कानाकोपऱ्यात गेलं आणि बारामतीचे नाव सांगितलं की ती पवारांची बारामती म्हणून ओळखली जाते. त्याच पार्श्वभूमीवर हा फलक पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.





