Pune District : डास निर्मूलनातील ‘बिजवडी पॅटर्न’चा मंत्रालयात ठसा

राज्यभर राबवणार योजना
बिजवडी – डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या जीवघेण्या आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी बिजवडी (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी सुरू केलेला ‘शेड नेट पिशवी’ पथदर्शी प्रयोग आता थेट मंत्रालयाच्या पातळीवर पोहोचला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला ‘बिजवडी पॅटर्न’ म्हणून मान्यता मिळाली असून, राज्यभर राबवण्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत.
गोतंडी (पालखी मार्गावरील गाव) येथे शौचालयांच्या वायू नलिकांवर व्हर्जिन शेड नेट पिशव्या बसवण्याचा प्रयोग डॉ. शहा आणि त्यांच्या सहकार्यांनी केला. या उपक्रमात गावातील डासांची पैदास 77 टक्क्यांनी घटली असून आतबाहेर होणारी डासांची हालचाल 98 टक्क्यांनी थांबली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या गावात एकही कीटकजन्य साथ आली नाही, ही या प्रयोगाची मोठी यशोगाथा ठरली.
या प्रयोगाची माहिती व सादरीकरण आरोग्य सचिव निपुण विनायक, डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. कैलास बाविस्कर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी डॉ. शहा व टीमचे कौतुक करत मंत्रालयात त्यांच्या सत्काराचे आयोजन केले.
डॉ. शहा यांच्या नेतृत्वाखाली 100 दिवसांत विविध उपक्रम राबवण्यात आले. रोबोटिक स्वच्छता, स्वयंचलित ठिबक सिंचन, कर्मचारी अडचणी निवारण, साथरोग नियंत्रणासह अनेक कामे करण्यात आली. या उपक्रमाला राज्यातील आरोग्य अधिकार्यांचे भरभरून समर्थन लाभले आहे. या उपक्रमात समाजभूषण शरदकुमार शहा चॅरिटेबल ट्रस्ट, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत व शालेय विद्यार्थ्यांनीही मोलाचे योगदान दिले. 10 हजार घरांपैकी 8 हजार पिशव्या तयार असून उर्वरित काम सुरू आहे. या प्रयोगाची सीडीसी अमेरिका, लंडन स्कूल ऑफ हायजिन, ऑस्ट्रेलिया गार्डन मास्टर यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संशोधनांशी सुसंगती असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या यशस्वी प्रयोगाची दखल ‘रयतेचा दरबार’ या दूरदर्शन सह्याद्री वरील कार्यक्रमानेही घेतली असून पुण्यातील तब्बल 1500 हून अधिक सोसायट्यांनी ही योजना राबवण्यासाठी माहिती मागवली आहे. या घडीला राज्यात डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा ‘बिजवडी पॅटर्न’ एक प्रभावी, कमी खर्चाचा आणि शाश्वत उपाय म्हणून समोर येत आहे. त्यामुळे या उपक्रमाचे राज्यभर अंमलबजावणी होणे ही काळाची गरज आहे.
या कार्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भरत शहा, आप्पासाहेब जगदाळे, प्रविण माने, अभिजित तांबिले यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करत भव्य अशा उपक्रमाची पाठराखण केली आहे.
विशेष ठळक मुद्दे :
* 10,000 घरांवर शेड नेट पिशव्या बसवण्याचा आराखडा
* डासांची पैदास 77% ने घटली, हालचाल 98% ने कमी
* ग्रामपंचायत, विद्यार्थी, स्वयंसेवकांचा सहभाग
* मंत्रालयात सादरीकरण, संपूर्ण राज्यात अंमलबजावणीचे संकेत





