पुणे जिल्हा : सत्ताबदलाची नांदी बाजार समितीपासूनच

नवखा उमेदवार असूनही बाबाजी काळे यांचा भरघोस मतांनी विजय
चाकण – खेड-आळंदी मतदारसंघात विद्यमान विरुद्ध नवखा उमेदवार यात विद्यमान एकतर्फी बाजी मारणार, असा विश्वास खुद्द विद्यमान आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांना होता; मात्र तालुक्यातील जनतेने ही निवडणूक हाती घेऊन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाबाजी काळे यांना भरघोस मतांनी निवडून दिले.
दिलीप मोहिते हे त्याच त्या कार्यकर्त्यांच्या आणि ठेकेदारांच्या घोळक्यात व्यस्त राहिल्याने सामान्य माणसांचा संवाद कमी झाला. अतिआत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांकडून केली जाणारी दादागिरीची भाषा त्यांना नडल्याची चर्चा आहे. तसेच महायुती असताना शिंदे गटाच्या काही पदाधिकार्यांनी महायुतीचा धर्म न पाळता महाविकास आघाडीचे बाबाजी काळे यांचा प्रचार केला. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे चित्र निर्माण झाले होते.
या ना अशा अनेक गोष्टींचा दिलीप मोहिते यांना पराभवाचा फटका बसल्याचे दिसते. विधानसभा पराभवाची सुरुवात मोहिते यांच्या अधिपत्याखाली असलेल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीला मोहिते यांनी स्थगिती मिळवली; मात्र न्यायालयाने निवडीचा मार्ग सुकर केला. यामुळे झालेल्या निवडणुकीत मोहिते यांच्या हातातील सत्तेला विरोधी गटाने मात दिली आणि यश मिळवले.
नेहमीच चर्चेत असणारा खेड-आळंदी मतदारसंघात पहिल्यापासूनच ही निवडणूक दिलीप मोहिते विरुद्ध सर्वपक्षीय कार्यकर्ते अशीच होती. मोहितेंच्या एकाधिकारशाही विरोधात नागरिक नाराज होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच काळे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवत शरद पवार गटाचे अतुल देशमुख हे प्रबळ दावेदार होते. खेडची जागा ही शरद पवार गटाकडेच होती; मात्र ही जागा ठाकरे गटाने पवार गटाकडून घेतली होती. आघाडीतील पवार गटाचे अतुल देशमुख, सुधीर मुंगसे यांनी सामंजस्य दाखवून काळे यांना मदत केली. सामंजस्य दाखवले नसते तर आज खेड तालुक्यात चित्र वेगळे असते.
खेड-आळंदी मतदार संघात युतीच्या लाडकी बहीण योजनेचा येथे फारसा फायदा झाला नाही. याचा अर्थ मोहिते यांच्या विरोधात नाराजीची सुप्त लाट तयार झाली होती आणि त्याचा फटका त्यांना मतदानामधून बसला, लाडकी बहीण या योजनेपूर्वीच आघाडीच्या तीन इच्छुक उमेदवारांनी तालुक्यातील सुमारे 70 हजारच्या आसपास महिलांना धार्मिक सहलीला नेले होते. त्याचाही काळे यांना निश्चित फायदा झाला. आमदार बाबाजी काळे हे वारकरी संप्रदायातील असून, महाविकास आघाडीतील सर्वांना बरोबर घेऊन काम करावे लागणार आहे.
खेड तालुक्यातील शहरी भागात वाहतुकीची कोंडी हा सर्वात मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. पिण्याचा व सांडपाण्याचा प्रश्न बिकट आहे. नद्या प्रदूषित झाल्या आहेत. तरुणांना रोजगाराचा प्रश्न आहे. त्याकडे काळे यांनी प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. तालुक्यात पर्यटन वाढवून त्यातून रोजगार निर्मितीकडेही लक्ष देऊन महिलांसाठी गृहउद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. अशा व इतर अनेक आव्हान, प्रश्नाचे शिवधनुष्य आमदार बाबाजी काळे यांना पेलावे लागणार आहे.
यापूर्वींच्या निवडणुका
सन, विजयी उमेदवार (मते), पराभूत उमेदवार (मते)
2009, दिलीप मोहिते पाटील (64726), अशोक खांडेभराड, 43934
2014, सुरेश गोरे (103207), दिलीप मोहिते पाटील (70489)
2019, दिलीप मोहिते पाटील (96866), सुरेश गोरे (63624)
मतदारसंघात राजकीय वर्चस्व कोणाचं?
2004 आणि 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते यांनी या मतदारसंघात विजय मिळवला आणि मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम राहिला होता. मात्र, पुन्हा एकदा 2014 मध्ये राजकीय परिस्थिती बदलली आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून निसटून शिवसेनेच्या सुरेश गोरे यांनी जिंकली. त्यानंतर पुन्हा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा विजय मिळवला आणि दिलीप मोहिते यांनी पुन्हा या मतदारसंघात विजय मिळवला आणि शिवसेनेचा प्रभाव कमी झाला. खेड आळंदी मतदारसंघावर आपली पकड पुन्हा मजबूत बनली आहे; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता मतदारसंघात काय होईल याबाबतची उत्सुकता लागली होती.
2019 मध्ये काय झाले होते?
खेड- आळंदी मतदारसंघात गेल्या विधानसभेला तिरंगी लढत झाली होती. दिलीप मोहिते तिसर्यांदा निवडून आले होते. त्यावेळी राज्यात शिवसेना- भाजपची युती होती. पण विसंवादामुळे युतीला खेड- आळंदीची जागा गमवावी लागली होती. युतीचे उमेदवार स्व. सुरेश गोरे यांच्याविरोधात भाजपचे अतुल देशमुख यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यामुळे मोहिते यांचा विजय सोपा झाला होता. त्यावेळचे मराठा आरक्षण आंदोलन आणि शरद पवार यांच्याबद्दल वाढलेली सहानुभूती याचाही फायदा मोहिते यांना झाला होता.





