पुणे जिल्हा : निवडणूक नि:पक्ष होण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर ः बारामती येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम
बारामती – निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. मतदार प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना सहभागी होता यावे, मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान प्रक्रिया सुलभ होऊन मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदानापासून मतदार वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदानाच्यावेळी विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.
बारामतीमधील कवी मोरोपंत सभागृह येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, निवासी नायब तहसीलदार विलास करे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, ‘स्वीप’ नोडल अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी संपत गावडे उपस्थित होते.
नावडकर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेत सुधारणा होत असून, त्यानुसार प्रशासन काम करीत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे शुद्धीकरण करुन ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीमध्ये नवीन मतदार नोंदणी, मयत नागरिकांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची नावे संबंधित मतदार संघात स्थलांतरित करणे अशा विविध प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने पार पाडण्यात आल्या आहेत.
८० वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी टपाली मत पत्रिका, महिला मतदारांच्या बाळासाठी पाळणाघर, दिव्यांगांसाठी आवश्यक साधने, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी टपाली मत पत्रिकेची सोय आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेच्यावेळी या सुविधेचा लाभ घेऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे म्हणाले, संसदीय प्रकारच्या भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया महत्वाची बाब मानली जाते. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक युवा मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. युवकांनी समाज व कुटुंबातील पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जागृत करावे, असे आवाहनही त्यांनी केले.





