पुणे जिल्हा: खेड पंचायत समितीवर थाळीनाद मोर्चा

राजगुरूनगर – अंगणवाडी महिला कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी आज राजगुरूनगर येथे खेड पंचायत समितीवर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा स्मृतिशिल्पापासून ते खेड पंचायत समितीपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. मोर्चानंतर अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने खेड पंचायत समितीच्या दारात धरणे आंदोलन झाले व मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी नवीन मदतनीस आदेशाची होळी करण्यात आली.
पूनम निंबाळकर म्हणाल्या, आमदार खासदार यांच्या सभांसाठी अंगणवाडी कर्मचार्यांना बोलावले जाते त्यांची उपस्थितीत मोठ्या संख्येने असते; मात्र त्यांच्या प्रश्नांसाठी आमदार खासदार पुढाकार घेत नाहीत म्हणून आम्ही त्यांचा या आंदोलनात निषेध करीत आहोत. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाईल.
यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे उपाध्यक्ष निलेश दातखिळे, जिल्हा अध्यक्ष सविंद्रा बोर्हाडे, सुमन फदाले, पूनम निंबाळकर, जिल्हा सचिव नयना वाळुंज, सोनाली पावडे, खेड तालुका अध्यक्ष सरला उढाणे, आंबेगाव तालुका अध्यक्षा शारदा शिंदे, शिरूर तालुका अध्यक्षा सीता मिसाळ, सचिव आरती थिगळे, अपर्णा वाघुले, पंचशीला कडलक, पुष्पा वाढाणे, माया राक्षे, अनुराधा गावडे, वंदना कोळी, सोनाली पावडे, सविता रायकर, गायत्री लोखंडे, स्वाती भाडळे, सरस्वती लिंभोरे, रेणुका व्यवहारे, हिराबाई गायकवाड, स्वाती माळी, अनिता भोंडवे बिसमिला तांबोळी, सलमा तांबोळी यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. यावेळी माजी जि. प. सदस्य बाबाजी काळे, निलेश दातखिळे, नयना वाळुंज, आदींची भाषणे झाली.
“सरकार अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना घरगड्यासारखं काम करायला लावत आहे. महिलांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारी योजनेत सरकारी अधिकारी काम करीत नाही. मगरूर शासन आणि अधिकारी आहेत, ते निर्णय घेत नाहीत. खासदारांकडून अंगणवाडी कर्मचारी मागण्यांबाबत बाबत शासन पातळीवर पाठपुरावा केला जाईल.” -निलेश कड, सामाजिक कार्यकर्ते





