पुणे जिल्हा : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयास सांघिक विजेतेपदाचा चषक

राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
राजगुरूनगर : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांघिक विजेतेपदाचा चषक हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाने पटकावला.
हुतात्मा राजगुरू यांच्या जयंती निमित्ताने येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात गेली 33 वर्षांपासून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. विजेत्यांना रोख बक्षीस व करंडक देऊन गौरविण्यात येते. शनिवारी (दि. 24) झालेल्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते झाले. उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष नामदेवराव कलवडे, संचालक बाळासाहेब सांडभोर, सुशिल शिंगवी,
हिरामण सातकर, सुरेश टाकळकर, अॅड. बाळासाहेब लिंभोरे, प्राचार्य डॉ. एस.एस. पिंगळे, डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य व्ही.डी. कुलकर्णी, प्रा.व्ही.बी.दौंडकर, प्रबंधक के.आर.पाचारणे उपस्थित होते. ही स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ गटात झाली. या स्पर्धेत मुलींनी बाजी मारत 13 पैकी 10 विजेतेपदांवर आपली मोहर उमटवली. राज्यभरातून 53 स्पर्धकांनी सहभाग घेतला.आशयघन वैचारिक मते, विषयांची नेमकी मांडणी आणि आत्मविश्वासाने भारलेल्या भाषणांनी शुक्रवारी झालेली ही वक्तृत्व स्पर्धा गाजली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. वर्षा देसाई (जुन्नर), डॉ पांडुरंग कंद (पुणे), प्रा विजय लोंढे (खडकी, पुणे) संतोष गाढवे (राजगुरुनगर) यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी खेड तालुका खरेदी विक्री संघ आणि अरिहंत नागरी पतसंस्थेचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक स्पर्धा समिती प्रमुख डॉ. संजय शिंदे, निकाल वाचन प्रा. मच्छिंद्र मुळूक, सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाळुंज व प्रा. मनीषा साबळे तर आभार प्रा. प्रवीण कारले यांनी मानले.
गटनिहाय तीन विजेते
वरिष्ठ गट : श्रद्धा अहिनवे (वाघिरे महाविद्यालय, ओतूर), अभिषेक मेमाणे (निर्मला निकेतन कॉलेज, मुंबई), साईराज घाटपांडे (फिरोदिया विधी महाविद्यालय, पुणे). कनिष्ठ गट : काजल वाळूंज (राजगुरू महाविद्यालय), परमेश्वर झाडे (पी. एम. पब्लिक कॉलेज, वाशिम), साक्षी शिवेकर (राजगुरू महाविद्यालय)





