Pune District : गुणवत्तेत वाढ झाली नाही तर शिक्षक जबाबदार

झेडपीचे सीईओ पाटील : जिल्ह्यातील दुसर्या समूह शाळेचा शुभारंभ
राजगुरूनगर – जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करूनही गुणवत्तेत वाढ झाली नाही तर त्याला शिक्षक जबाबदार असतील, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी येथे केले.
वाडा (ता. खेड) येथे पुणे जिल्ह्यातील दुसरी जिल्हा परिषद प्राथमिक समुह शाळेचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते झाले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, शालिनी कडू, माजी उपशिक्षणाधिकारी सिध्दार्थ चव्हाण, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, सरपंच रुपाली मोरे, उपसरपंच रोहीदास शेटे, शिवाजी मोरे, अक्षय केदारी, जाकीर तांबोळी, मनोहर पोखरकर, निरिक्षक गौतमी डांगे,
विस्ताराधिकारी संजीवनी घाटकर, विस्तार अधिकारी के. बी. मोरे, बांधकामचे उप अभियंता जयंत कचरे, शाखा अभियंता जितेंद्र शिंदे, हॅविटेट फॅार ह्युमॅनिटी इंडियाचे बुरहानुद्दीन बोहरा, केंद्रप्रमुख तुकाराम धादवड, विजय सुरकुले, भरत चिंचकर, ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र मस्के, सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाडा व वाडा परिसरातील कमी पटसंख्या असलेल्या सुरकुलवाडी केंद्रातील वाडा, सतुर्केवस्ती, पावडेवाडी, पिंगटवाडी, कदमवाडी, लांडगेवाडी, वाडेकरवाडी या सात शाळा मिळून 108 विद्यार्थ्यांची समूह शाळा वाडा येथे सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील ही दुसरी समूह शाळा आहे. यावेळी पाटील म्हणाले, वाडा येथील या समुह शाळेसाठी 42 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
या अंतर्गत शाळेसाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात 35 शाळा समूह शाळा करण्यात येणार आहेत. शिक्षकांनी गुणवत्ता वाढवण्यासाठी जादा वर्ग, स्पर्धा मार्गदर्शन याकडे लक्ष दिले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शमा घोडके यांनी केले, सूत्रसंचालन मच्छिंद्र जगदाळे यांनी तर अभिजीत नाईकरे यांनी आभार मानले.
गावातील शाळा व दवाखाने चांगले झाले तर आपले आरोग्य चांगले राहते तसेच चांगले व दर्जेदार शिक्षण मिळते, पुणे मॅाडर्न स्कूल समूह शाळेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळेपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार व मोफत शिक्षण उपलब्ध होणार आहे. गुणवत्तेच्या बाबतीत समूह शाळा उपयुक्त ठरणार आहेत.
– संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी





