Pune District : कृषी शिक्षणासाठी तात्यासाहेब भुजबळांचे योगदान प्रेरणादायी – मेहेर

नारायणगाव – कृषि शिक्षणाचा यज्ञ अविरत सुरू राहण्यासाठी महादेव विठोबा तथा तात्यासाहेब भुजबळांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे तात्यासाहेब भुजबळ यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी सांगितले.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, उपकार्याध्यक्ष डॉ.आनंद कुलकर्णी, कार्यवाह रविंद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर, कृषि शिक्षण संकुलाचे प्रमुख रत्नदीप भरविरकर, संचालक डॉ.संदीप डोळे, तान्हाजी वारुळे, आल्हाद खैरे, डी.के.भुजबळ, कुणाल भरविरकर, तात्या साहेबांचे कुटुंबीय, विविध विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.तात्यासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित होऊन भूमिगत राहून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी म्हणून कार्य केले. संस्थेला त्या काळात कृषि शिक्षणासाठी १६ एकरचा मळा दिला. त्याचेच फलित आज गरीबातील गरीब विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे.
आपल्या संस्थेतील विद्यार्थी देशात आणि विदेशात आपले नावलौकिक करत आहेत. देशाच्या विकासात अन्न धान्य निर्मितीत आपल्या संस्थेचा खारीचा वाटा असल्याचा अभिमान वाटतो.
गुरूवर्यांनी घालून दिलेला पायंडा जोपासताना विद्यार्थी व शेतकरी यांना चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करून देण्यावर संस्थेचा भर आहे, असे मेहेर यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि तंत्र निकेतनचे प्राचार्य गायकवाड, सूत्रसंचालन डॉ. सत्यवान थोरात, डॉ. प्रशांत शेटे यांनी आभार मानले.





