पुणे जिल्हा : तळेगाव ढमढेरे चोवीस तासांत वीजपुरवठा सुरळीत

महावितरणकडून शर्तीचे प्रयत्न
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे (दि.15) मे रोजी सायंकाळानंतर अचानक ढग दाटून आले. वादळी वाऱ्यात महावितरणचे पोल कोसळले होते. महावितरणकडून शर्तीचे प्रयत्न करीत चोवीस तासांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
तळेगाव परिसरात वेगवान वारे वाहू लागले. थोड्या वेळाने पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सुमारे एक ते दीड तास कोसळत होता. अचानक वेगवान वारे वाहू लागले. त्यामुळे या परिसरात पाच ते सात मिनिटांचे जोरदार वादळ आले. झाड्यांच्या फाद्या मोडल्या, झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे गावाला तडाखा बसला होता.
चक्रीवादळामुळं तळेगाव ढमढेरे परिसरातील विजेच्या तारा आणि विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा पूर्णतः बंद झाला होता. संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने तळेगाव ढमढेरे महावितरणचे शाखा अभियंता श्रीकांत ताटीकोंडा ,विद्युत सहाय्यक आकाश महाजन, प्रकाश भुजबळ, गोविंद गावित, सागर गिरी, धनंजय देशमुख,
अविनाश खोळंबे, विशाल पवार, अमित होनकळसकर, रामदास शिंदे यांनी तातडीने तुटलेल्या विद्युत तारा तसेच पडलेले खांब यांची उभारणी करत चोवीस तासात वीजपुरवठा सुरळीत केला.





