आळंदी : खेड तालुक्यातील आळंदीतील गोपाळपुरा येथे मकरसंक्रातीच्या हळदी-कुंकू समारंभात संविधान घ्या, संविधान द्या उपक्रम राबवून संविधानाचा जागर करण्यात आला.
भिडेवाडाकार फुलेप्रेमी संविधान दूत विजय वडवेराव यांनी भारतीय संविधानाबाबत जागृती व्हावी, संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी महीला वर्गाच्या हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने एकत्र येणार्या स्त्रियांनी तिळगुळा सोबतच संविधान दूत बनून संविधानातील विचारांची देवाण घेवाण करावी, संविधाना विषयी सामान्य नागरिकांत जागृती करावी, संविधानाचा प्रचार प्रसार करावा,
संविधानाची ओळख करून द्यावी व संविधानाने आपल्याला दिलेले हक्क अधिकार, आपली कर्तव्ये नागरिकांना समजावीत म्हणून मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत होणार्या हळदी कुंकू समारंभात तिळगुळ देण्या घेण्या सोबतच संविधानातील विचारांचीही देवाण घेवाण करावी यासाठी मकरसंक्रांत – हळदी कुंकू समारंभ स्पेशल संविधान द्या संविधान घ्या या आगळया वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्याला आळंदीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विजय वडवेरावांनी आयोजित केलेल्या आंतर राष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये आलेल्या फुलेप्रेमी कवींना 600 पेक्षा संविधान ग्रंथ वितरित केले होते. या सर्व फुले प्रेमी कवयित्रिंनी संविधान दूत बनून हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर करावा असे आवाहन त्यांनी केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत घरगुती हळदी कुंकु समारंभात संविधानाचा जागर केला जात आहे. दरम्यान, हळदी कुंकू समारंभात इतक्या मोठया प्रमाणात संविधानाचा जागर होणे ही बहुधा देशातील पहिलीच घटना असावी, असे बोलले जात आहे.