पुणे जिल्हा : अकलूज येथे आज सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार

“खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांची माहिती”
अकलूज – अकलूज शहरामध्ये विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे रविवार (दि.29) रोजी दुपारी 2 वाजता माजी गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वच नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान करण्याचे ठरवले आहे. हा कार्यक्रम शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.
राज्यातील अनेक नेते मंडळी यावेळी उपस्थित असतील. हा कार्यक्रम फक्त सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आहे. नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान सोहळा आहे, त्यामुळे यावेळी राजकीय प्रवेश होणार नाहीत. असेही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.
अकलूजमध्ये कार्यक्रमाची तयारी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, युवानेते अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असुन सोलापूर सातारा जिल्ह्यातुन सुमारे एक लाखाचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचे मोहिते-पाटील यांनी यावेळी सांगितले.





