पुणे जिल्हा : इंदापूर तालुक्यातील सुजाण मतदारांची सुप्रिया सुळेंना साथ

– महायुतीच्या नेत्यांची फौज कामाला लागूनही पदरी अपयश
अमोल राजपूत
वालचंदनगर – बारामती लोकसभा निवडणुकीत राजकीय नेते एकीकडे आणि मतदार एका बाजूला झाले असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे मतदार उभे राहिल्यामुळे, इंदापूर तालुक्यातून २५ हजार ६८९ मतांचे मताधिक्य सुप्रिया सुळेंना मिळाले. तर इंदापूर शहरातील मतदारांनी २ हजार ५८ मताधिक्य मिळाले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभाजन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाली. अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला पाठिंबा दिला. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली. नणंद आणि भावजय आमनेसामने निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या.
भाजपचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर एकत्र आले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, सदस्या अंकिता पाटील-ठाकरे, वैशाली पाटील, हनुमंत बंडगर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, प्रताप पाटील यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य, अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आदी सर्वजणांचे एकमेकांचे विरोधक असूनही सूत जुळले.
राष्ट्रीय नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या बाजूने दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, अॅड.इनायत काझी, अमोल भिसे, किसन जावळे, छगन तांबिले, सिकंदर बागवान, संजय शिंदे आदी कार्यकर्त्यांनी समर्थपणे साथ दिली.दरम्यान काळात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समितीचे सदस्य प्रदीप जगदाळे, शकील सय्यद, प्रशांत उंबरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीत नेते मंडळी एकीकडे तर सुजाण मतदार दुसऱ्या बाजूला खंबीरपणे उभे राहिले. शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून होणारा हल्लाबोल परतून लावण्यासाठी जाणकार मतदार भक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभे राहिले. समाजवादी विचाराच्या सर्व संघटना सुळेंच्या पाठिशी उभ्या राहिल्या होत्या.त्यामुळे विजय खेचून आणता आला. सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ७० हजार मताधिक्य इंदापूर तालुक्यातून मिळाले होते. यंदा मताधिक्य कमी झाले.
शहांमुळे मताधिक्य…
मागील निवडणुकीत हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दत्तात्रय भरणे होते. या लोकसभा निवडणुकीत दोघेही विरोधकांच्या भूमिकेत होते. नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा, भरत शहा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळेच इंदापूर शहरातून मताधिक्य मिळाले. मराठा सेवा संघ,बामसेफ, बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना खंबीरपणे साथ दिली.





