Pune District : सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील बसले प्रेक्षकांत

इंदापूर : इंदापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी (दि. 25) राजाकीय नाट्य रंगले होते. या कार्यक्रमात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसावे लागले.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात सरकारी कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला न गेल्याबद्दल सुळेंनी नाराजी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे असून याच मतदारसंघात इंदापूर येते तरीही त्यांच्या नावाचे निमंत्रण या कार्यक्रमात नव्हते. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी त्यांनी मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतर नेत्यांशी संवाद साधली तर आपली नाराजीही व्यक्त केली.
सुळे यांनी अनेक वेळा राज्यभरातील सरकारी कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण न दिल्याचा आरोप केला आहे. या कार्यक्रमात देखील त्यांचा सत्कार प्रेक्षकांच्या पंक्तीमध्ये बसून करण्यात आल्याने या उद्घाटनाचा कार्यक्रमाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भावा-बहिणीचा अबोलाच
इंदापुरातील उद्घाटन कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या कार्यक्रमावेळी संवाद साधला. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचा देखील संवाद झाल्याचे दिसून आले, पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ-बहिणीतील अबोला या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला.
प्रशासन म्हणाले की…
उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या रुपरेषेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्यानुसार कोण व्यासपीठावर बसणार, त्याची आसन व्यवस्थाही न्यायालयाकडून आलेली आहे, त्यानुसार व्यासपीठावर आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, आरिफ सा. डॉक्टर यांच्यासोबत मंत्री म्हणून केवळ अजित पवार आणि दत्तात्रेय भरणे यांची व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे.





