पुणे जिल्हा : सिंचन प्रश्नासाठी अजितदादांना पाठिंबा

इंदापूर येथील राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे यांचा खुलासा
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी, लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना यांसह इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिले आहे, असा खुलासा माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला.
इंदापूर येथे (7 जुलै) तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रताप पाटील, डी. एन. जगताप, विजय शिंदे, अमोल भिसे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, दीपक जाधव, सचिन सपकाळ, नवनाथ रुपनवर, विठ्ठल ननवरे, धनंजय बाब्रस, बापू शेंडे, दशरथ डोंगरे, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार भरणे म्हणाले, अजित पवार यांना पाठिंबा का दिला, याची कल्पना असणे गरजेचे आहे म्हणून बैठक बोलावली आहे.
इंदापूर तालुक्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे लक्ष आहे. अनेक प्रश्न अजित पवारांना माहित आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता 2012 मध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला. 2014 मध्ये इंदापूर तालुक्याचा आमदार बनला. 2019 ला आमदार आणि राज्यमंत्री झालो हे आपणास ज्ञात आहे. इंदापूर शहर व तालुक्यात नऊ वर्षात जो काही विकास झाला याच्या पाठीमागे पवार यांचा वाटा आहे.
शेती सिंचनाचा प्रश्न मोठा आहे. 22 गावचा पाणीप्रश्न, खडकवासल्याचा पाणीप्रश्न, लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न रखडलेला आहे. शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. तसेच मुळशी धरणाचे पाणी इंदापूर तालुक्यात आणायचे आहे. इंदापूर शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन करावयाचे आहे. त्या ठिकाणी असलेल्या चॉंदशाहवली दर्ग्याचा विकास करावयाचा आहे. इंदापूर शहराचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी अजित पवार यांना पाठिंबा दिला.
अजित पवारांना 40 आमदारांनी व दोन खासदारांनी पाठिंबा दिला. जसा काळ येतो तसा बदल करावा लागतो. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला. केंद्रामध्ये भाजपाचे सरकार असेल तर बाजूला राहून विकास होऊ शकत नाही. विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या. आपली राष्ट्रवादीची संघटना मजबूत ठेवा. बुथ कमिट्या तयार करावयाच्या आहेत. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांचा अभ्यास करावा अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली. तालुक्याच्या विकासासाठी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे.
– प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस
एक वर्षानंतर निर्णय
लोकसभेची निवडणूक एक वर्षानंतर आहे. त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत त्यामुळे लोकसभेचा निर्णय वर्षानंतर घेऊ असे गारटकर यांनी स्पष्ट केले.





