पुणे जिल्हा : सुळेंनी दिला सुनेत्रा पवारांना सांजआरतीचा मान

पवार कुटुंबीयातील नात्यातील गोडवा वृद्धिगंत
जळोची – बारामती शहरात संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा विसावला. यावेळी बारामती शहरात शारदा प्रांगणामध्ये सांजआरती झाली. यावेळी हजारो भाविक सहभागी झाले होते. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्यातील नात्यातील प्रत्यय पालखी सोहळ्याने अनुभवला. सुळे यांनी भावजयला सांजआरतीचा मान देत नात्यातील स्नेह वृद्धिगंत केला.
बारामती दरवर्षी होणारी ही सांज आरती देहू ते पंढरपूर वारीतील मोठी अशी सांज आरती आहे. साहजिकच सांजआरतीला बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील भाविकही उपस्थित असतात. पहिल्यांदाच दोन खासदार सांजआरतीला उपस्थित राहिले. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही पहिल्यांदाच उपस्थित होत्या, नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार याही उपस्थित होत्या.
सुनेत्रा पवार आल्या, त्यावेळी त्या पालखी जिथे ठेवतात, त्या खालच्या भागात उभ्या होत्या. त्या तिथेच उभ्या राहिल्या, सुप्रिया सुळे आल्यानंतर शारदा प्रांगणाच्या व्यासपीठावर आल्या. व्यासपीठावरूनच त्यांनी लोकांना नमस्कार केला. त्या महिलांमध्ये गेल्या. गर्दीत पुरुष वारकऱ्यांमध्ये गेल्या. त्यांच्याशी संवाद साधला.
पालखी काही वेळाने आणली. तेव्हा सुनेत्रा पवार खालीच होत्या. सुप्रिया सुळे मात्र वरतीच उभे राहिल्या, काही वेळानंतर तिथे प्रतिभा पवार आल्या. प्रतिभा पवार व सुप्रिया सुळे या दोघी मायलेकी एकाच ठिकाणी थांबून होत्या. ज्यावेळी आरतीची वेळ आली. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी ताईंना खाली बोलवा, असे सांगितले. परंतु सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहत खाली गर्दी आहे, तुम्हीच आरती करा, असे सांगत आरतीचा मान वहिनीकडे देत आरती पार पडली. बारामतीच्या राजकारणात नेहमीच निवडणुकीनंतर राजकारण होत नाही. असे पवार कुटुंब सांगते. त्याचा प्रत्यय सांजआरतीवेळी आला.





