पुणे जिल्हा : शिक्षकेतर महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी चौथ्यांदा सुखदेव कंद

लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील सुखदेव कंद यांची चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे राज्यस्तरीय 51वे अधिवेशन जिमखाना मैदान, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे पार पडले. यावेळी महामंडळाची कार्यकारिणी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस महामंडळ पदाधिकारी, राज्यामधील सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, कार्यवाह व सेवक प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने (सातारा), कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर (चंद्रपूर) सरकार्यवाह शिवाजी खांडेकर (पुणे), सर्व उपाध्यक्ष, विभागीय कार्यवाह, प्रसिद्धी प्रमुख व अंतर्गत हिशोब तपासणीस यांच्या उपस्थितीमध्ये सुखदेव कंद यांची फेरनिवड करण्यात आली.
नोव्हेंबर 2023 मध्ये पुण्यात महामंडळाची त्रैवार्षिक निवडणूक झाली होती. त्यामध्ये 18 जागांपैकी शिवाजी खांडेकर यांच्या पॅनेलचे 14 पदाधिकारी बिनविरोध व उर्वरित 4 मतदान होऊन विजयी झाले होते. शिवाजी खांडेकर यांची सलग चौथ्यांदा महामंडळंच्या सरकार्यवाहपदी निवड झाली होती. ज्या जिल्ह्याकडे सरकार्यवाह पद असते त्याच जिल्ह्यामधून महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी सरकार्यवाह हे निवड करतात. शिवाजी खांडेकर यांनी सुखदेव कंद यांना सलग चौथ्यांदा संधी दिली आहे.
सुखदेव कंद हे ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे गेली 30 वर्षे वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या निवडी बद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अरुण घुले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना मुखवटे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.





