पुणे जिल्हा : पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत काठापूरच्या श्वेता करंडेचे यश

लाखणगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील शेतकरी कुटुंबातील श्वेता सुखदेव करंडे उत्तीर्ण झाली असून तिचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळेपासून सुरू झाले आहे. काठापूर बुद्रुक गावातील पहिली महिला अधिकारी आहे. तिच्या यशाबदल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2022 च्या पीएसआय परीक्षेत श्वेता करंडे उत्तीर्ण झाली आहे. ग्रामीण भागात राहून खडतर प्रयत्न करून श्वेताने हे यश मिळवले आहे. सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप येथे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर आठवी ते १० वीचे शिक्षण संगमेश्वर विद्यालय पारगाव,
तर ११ वी व १२ वीचे शिक्षण विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक येथे झाले. पारगाव येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान, त्यानंतर दिलीप वळसे पाटील सीनियर कॉलेज निमगाव सावा या ठिकाणी द्वितीय व तृतीय वर्षाचे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. २०१८ साली पदवी प्राप्त केली. त्याआधीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. घरीच हा अभ्यास तिने केला. मागील काही दिवसापासून शिरुर येथील ज्ञानसागर अभ्यासिकेत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करून यश मिळवले.
तिला अभ्यासात शिवाजी शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. याआधी दोन गुणांनी तिला अपयश आले होते. परंतु खचून न जाता तिने यश मिळवले आहे. शेतकरी आई-वडील अशी कौटुंबिक परिस्थिती असताना मिळवलेले हे यश गावातील इतर तरुणांना मार्गदर्शक ठरणारा आहे.





