Pune District : संस्कृतीचा अभ्यास केल्यास मराठी भाषा गतीमान होईल

प्रा. बाळासाहेब जगताप ः मराठी अभिजात भाषा दर्जा सप्ताहात विविध उपक्रमांची रेलचेल
लोणी काळभोर – मुकुंदराजांच्या ‘विवेकसिंधू’ पासून ते महानुभाव पंथ, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपर्यंत मराठी भाषेला गौरवशाली परंपरा लाभली आहे. गोमटेश्वराच्या शिलालेखांपासून ते दिवेआगरच्या ताम्रपटापर्यंत मराठी भाषा कोरीव स्वरूपात आढळते. तिला तब्बल 1500 ते 2000 वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. या शिलालेख आणि ग्रंथांमधून लिहिलेल्या मराठी भाषेत श्रेष्ठ दर्जाचे साहित्य आढळते, म्हणूनच मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ दर्जा प्राप्त झाला आहे, असे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब जगताप यांनी केले.
समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील मराठी विभाग आणि गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी अभिजात भाषा दर्जा सप्ताह या उपक्रमात बोलत होते. हा सप्ताह 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे.
प्रा. जगताप म्हणाले, भविष्यात मराठीच्या बोली भाषांचा आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास केल्यास मराठी भाषा आणि संस्कृती अधिक जिवंत राहतील आणि गतीमान होतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सतीश कुदळे म्हणाले, मराठी भाषेला अतीप्राचीन वारसा लाभला असून तिचे संवर्धन पुढील पिढ्यांच्या हातात आहे. आज मोबाईलच्या युगात तरुणांचे वाचन कमी झाले आहे. प्राचीन ग्रंथांचे वाचन केल्यास जीवनतत्त्व समजण्यास सुलभ होते. संतांच्या अभंगांमधून आजही जीवनमूल्यांचा संदेश मिळतो.
मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजयकुमार घोडके यांनी सांगितले की, रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 3 ऑक्टोबर 2024 रोजी 500 पानांचा अहवाल सादर करून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला. भविष्यात मराठीच्या विविध बोलींवर संशोधन होणे गरजेचे आहे. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर, प्रा. डॉ. संभाजी निकम, प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संभाजी निकम यांनी मानले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला, ग्रंथप्रदर्शन, काव्यलेखन आणि मराठी पत्रलेखन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.





