Pune District : वांगणीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव

विंझर – आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगणीवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
यावेळी वांगणीवाडी गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा असून आपले आई-वडील भात शेती करत असताना किती कष्ट करतात याची जाणीव मुलांना व्हावी व श्रमप्रतिष्ठा हे मूल्य त्यांच्यात रूजावे यासाठी शाळेने हा उपक्रम आयोजित केला होता. तसेच शाळेतील पदवीधर शिक्षक विकास गायकवाड यांनी ‘भाताचे मोल’ ही कथा सांगून विद्यार्थ्यांमध्ये अन्न वाया न घालवण्यासंदर्भात जागृती निर्माण केली. भाताचे रोप खणणे, मुठ बांधणे, भाताच्या शेतात चिखल करणे व प्रत्यक्ष लावणी करणे हे अनुभव विद्यार्थ्यांनी घेतले.
शाळेचे मुख्याध्यापक सतीश कोंडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मीना चोरघे यांनी लावणी करत असताना भलरी गीते म्हणून मुलांचे मनोरंजन केले. भलरी गीते म्हणून मुलांनी लावणीचा आनंद घेतला. शेत मालक संतोष ढमाळ व सुशीला ढमाळ यांनी शाळेतील सर्व मुलांना खाऊ वाटप करून मुलांचे अभिनंदन केले.
वांगणीवाडी गावच्या सरपंच मनीषा चोरघे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियंका वाडघरे, शिक्षिका ज्योती शिशुपाल व प्रमिला लहांगे, माजी अध्यक्ष राहुल बिरामणे, पालक रोहिदास चोरघे, संजय चोरगे यांनी उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सहकार्य केले.





