पुणे जिल्हा : काऱ्हाटी परिसरात ‘मृग सरींची’ दमदार हजेरी

शेतकऱ्यांना खरिपाची आस : यंदा पोषक वातावरण
काऱ्हाटी – बारामती तालुक्यातील काऱ्हाटी परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी बाजरी पेरा करण्यासाठी सरसावला असल्याचे चित्र दिसून येत आहेत. मृग नक्षत्राचा पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी झाल्याचे चित्र आहे.
संपूर्ण पावसाळा ऋतूत मृग नक्षत्राच्या पावसाची शेतकऱ्यांना खरी आस असते. या नक्षत्रातील पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो. या पावसाची पेरणी लागवड फार महत्वपूर्ण मानली जाते. या नक्षत्रात पेरणी व लागवड झाल्यास उगवण चांगली होते. व ती पिके निरोगी व पुढे हंगामात भरघोस उत्पन्न देणारी असते. म्हणून शेतकऱ्यांना या मृगनक्षत्राच्या पावसाची मोठी आशा व प्रतीक्षा असते. इतर नक्षत्रात उशिरा झालेली पेरणीच लागवड झाल्यास तिची उगवण चांगली असते.
शेतकऱ्यांना रोहिणी नक्षत्राचा पाऊस नको असतो कारण शेतकरी म्हणतात रोहिणी नक्षत्रात पावसाने सुरुवात केली तर पुढे मृग नक्षत्रात पाऊस येत नाही असा अंदाज व्यक्त करतात. म्हणून आता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मृगाच्या पावसाचीच आस लागली आहे. आणि तोच पाऊस शेतकऱ्यांना उपयुक्त व उपयोगी असतो.
यंदा शेतकऱ्यांनी खरिप पीक हंगाम पावसापूर्वीच शेती मशागत नांगरणी बखरणी रोटाव्हेटर मारणे पाभारीच्या साह्याने गवत काढणे जाळणे साफसफाई करुन सऱ्या मारण्यापर्यंत काम करुन ठेवले आहे. कारण गत आठदहा दिवसांपासून हवामानात बदल होवून अवकाळी व रोहिणी नक्षत्रांने बादळीवाऱ्यासह विजेची कडकडाट ढगांची गडगडाटासह अधूनमधून पाऊस होत असल्याने शेतकरी सतर्क झाला व त्याने आपला मोर्चा शेतीकडे वळला असून शेतीकामे हाती घेत मशागत आटोपली आहे.
वाफसा आल्यावर पेरणी होणार
आता फक्त पावसाची प्रतीक्षा होती. परंतू मृग नक्षत्राचा जोरदार पाऊस बरसला या पावसामुळे शेतात पाणी साचून ओलावा निर्माण झाला आता वाफसा आल्यावर शेतकरी शेतात पेरा करण्यासाठी सज्ज झालेला दिसून येत आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्याने हमखास उत्पन्नाची पिके घेण्याची शेतकऱ्यांनी ठरवले असून यामध्ये बाजरी, तूर ,मूग ,सूर्यफूल, सोयाबीन आधी पिके घेण्या योग्य पाऊस झाला आहे. तसेच बाजारपेठेत खते बियाणे घेण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.





