Pune District : स्मार्ट मीटरला पुरंदर तालुक्यात तीव्र विरोध

अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक
सासवड – महावितरण कंपनीने पुरंदर तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रारंभ केल्यानंतर ग्राहकांच्या असंतोषाला उधाण आले आहे. कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रसाद आत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले सासवड (ता. पुरंदर) येथील कार्यकारी अभियंता यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुरंदर तालुका यांच्या वतीने लेखी निवेदन दण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महावितरणने स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय एकतर्फी व जबरदस्तीचा असून वीज कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशांचा सरळसरळ भंग आहे. कलम 47(5) नुसार मीटर बदलाचा निर्णय ग्राहकालाच असतो.ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये ग्राहकांच्या संमतीशिवाय सेवा बदलास विरोध आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने (दि. २५ एप्रिल २०२५) दिलेल्या आदेशात, कोणत्याही ग्राहकावर स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. स्मार्ट मीटर बसवण्याची कारवाई थांबवली नाही तर आपल्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रसाद अत्रे यांनी दिला आहे. यावेळी चंद्रकांत झगडे संतोष काकडे, तुकाराम देवकर, महादेव खेगरे पाटील उपस्थित होते.





