Pune District : प्लॅस्टिकचे गज वापरल्यास तीव्र आंदोलन करणार

भवानीनगर : श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या लगत असलेल्या गटर लाइनचे काम काटेवाडीनंतर इंदापूर तालुक्यामध्ये सणसर या ठिकाणी सुरू करण्यात आहे. काटेवाडी या ठिकाणी जे प्लॅस्टिकचे गज वापरण्यात आले होते, त्याचप्रमाणे गज इंदापूर तालुक्यातील सणसर या ठिकाणी वापरले जात असल्याने अशा प्रकारे प्लॅस्टिकचे गज वापरण्यात आले तर या या संदर्भात सणसर गावातील व परिसरातील ग्रामस्थ एकत्र येऊन तीव्र आंदोलन उभा करणार असल्याची माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंतराव जगताप व सणसर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर यांनी दिली.
श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सणसर या भागातून जात असल्याने या ठिकाणी रस्त्याच्या कडेला गटर लाइनचे काम सुरू झाले आहे; परंतु या लाइनमध्ये वापरण्यात आलेले लोखंडी गज (सळई) ऐवजी प्लॅस्टिकचे गज वापरण्यात येत असल्याने या गटरलाइनवरून भविष्यात शेतकरी आपल्या शेतामध्ये जात असताना व श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला याच गटर लाइनवरून उसाची वाहतूक करताना हे लाइन टिकणार नसल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे.
या बाबत अनेक शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली; मात्र अजूनही या रस्त्याच्या कामामध्ये बदल केला जात नसून लोखंडी गज (सळई) वापरली जात नाही. हे प्लॅस्टिकचे गज खर्या अर्थाने चांगले असतील तर या गटर लाइनवरून उसाने भरलेल्या ट्रॅक्टर जाणार आहे का व तसे असेल तर गेल्या महिन्यात दोन महिन्यापर्यंत जे गटर लाईन तयार झालेले आहे त्या गटर लाइनला लोखंडी गज (सळई) का वापरण्यात आले आहे.याबाबत ठेकेदाराला विचारले असता ठेकेदार म्हणत आहे की, हे प्लॅस्टिकचे गज अधिकृतरित्या असून अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत.
प्लॅस्टिकचे गज चांगल्या प्रतीचे असतील तर आजपर्यंत राज्यामध्ये हजारो मोठमोठे बिल्डिंग इमारती उभा राहिल्या आहेत. त्या बिल्डिंगला अशाप्रकारे प्लॅस्टिकचे गज का वापरले जात नाहीत. शंभर मजली, 50 मजली, दहा मजले, इमारतींना लोखंडी गजच का वापरले जात आहेत. या सगळ्यांचा विचार करता प्लॅस्टिकचे गजाची ताकद लोखंडी गजाएवढी होऊ शकत नाही. तरीही हे प्लॅस्टिकचे गज शासनाने वापरण्यास ठेकेदाराला परवानगी दिली असली तरी देखील सणसर, काटेवाडी गावातील नागरिकांचे मत आहे की अशा प्रकारे प्लॅस्टिकचे गज वापरले जाऊ नये. नक्की हे प्लॅस्टिकचे गज योग्य आहेत का नाहीत याची शहानिशा करण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये या प्लॅस्टिकच्या गजासंदर्भात माहिती द्यावी, अशी मागणी सणसर, काटेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.





