– सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन अवसरी : लहान वयात मुला, मुलींच्या शिक्षणाचा पाया भक्कम केला तर पुढे त्यांना अभ्यासात त्रास होत नाही. मुले विविध क्षेत्रात चांगले काम करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्यासाठी आई-वडिलांबरोबर शिक्षकांचीही मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवार, दि. ३१ रोजी व्यक्त केले. अवसरी खुर्द येथील कवयित्री शांता शेळके सभागृह इंजिनियरिग कॉलेज येथे डीजी फाउंडेशन यांच्यावतीने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विकास कार्यावर आधारित एकच ध्यास शाश्वत विकास या कार्या अहवालाचे प्रकाशन आणि शिक्षण परिषदेचे उद्घाटन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. सागर देशपांडे, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील,शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, विष्णूकाका हिंगे पाटील, मानसिंग भैय्या पाचुंदकर, संजय गवारी प्रकाशराव घोलप,गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज,प्रकाश घोलप, संजय गवारी, प्राचार्य डी. आर. पानगव्हाणे, मुख्याध्यापक सुनील वळसे पाटील, प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. यावेळी वळसे पाटील म्हणाले की, इंजिनिअरिंग कॉलेजमुळे शेकडो तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होऊन चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी मिळाली आहे. इंजिनिअरिंगपेक्षा आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जास्त मागणी आहे. गोनवडी घोडेगाव या ठिकाणी असलेल्या आयटीआय प्रशिक्षण केंद्रातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील विविध शाळा चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावला असून त्या पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंबही शिक्षकांनी करावा. त्यामुळे भविष्यात इंग्रजी आणि मराठी शाळांच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी मदत होऊ शकेल असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी विवेक वळसे पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पानगव्हाणे, सौरभ शिंदे, राजश्री तिटकारे, डॉ. सागर देशपांडे यांनी यांची भाषणे झाली. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. सुनील वळसे पाटील यांनी आभार मानले.