Pune District : कृषी विज्ञान केंद्रांचे बळकटीकरण करा

नारायणगाव : केंद्र व राज्य सरकारने कृषी विज्ञान केंद्रांचे बळकटीकरण करावे अशी मागणी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे.
नारायणगाव येथील ग्लोबल कृषी महोत्सव पीक प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन व पीक परिसंवाद प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मेहेर यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्याकडे मागणी केली.
मेहेर म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्रांचे बळकटीकरण झाल्यास कृषी तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधावर जाईल, फसवणुकीला आळा बसेल, शाश्वत बी बियाणे व खते मिळतील, अनुदान आणि यंत्रसामग्री मिळेल तसेच शेतकर्याचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढीस मदत होईल. कृषी प्रदर्शनात शेतकर्यांसाठी वेगवेगळे विभाग निर्माण केले असून शेतकर्यांच्या शेतमालास बाजार भाव मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र प्रयत्न करीत असून शेतकर्यांच्या मुलांना शेतीभिमुख करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मेहेर म्हणाले की, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, वडगाव मावळ, मुळशी तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आहे. अति पावसाचा, मध्यम आणि कोरडवाहू भाग अशाप्रकारे तीन टप्प्यात वर्गवारी केली तर पीकनिहाय पद्धतीमध्ये बदल होत जातो. याचाच विचार करून कृषी विज्ञान केंद्राच्या ग्लोबल कृषी महोत्सवात शेतकर्यांना शेती संदर्भात फायदेशीर असणार्या कंपन्यांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रदर्शनात टेस्टेड टेक्नॉलॉजी असलेले उत्पादक
नारायणगाव येथे भरलेल्या ग्लोबल कृषी महोत्सवात शेतकर्यांसाठी टेस्टेड टेक्नॉलॉजी असलेल्या कंपन्यांचे खते, औषधे व बी बियाणांचे स्टॉल लावण्यात आले आहे. मार्केटिंग डोळ्यासमोर ठेवून आम्ही उत्पादकांना बोलावत नाही. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सेंद्रिय शेती संदर्भात कृषी विज्ञान केंद्रात प्रकल्प राबवले जात आहे. आपल्या भागातील हवामानात होणारे बदल विचारात घेऊन कोणती पिके चांगली येतात ती शेतकर्यांना अवगत केली जातात. यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे येथील बायो टेक्नॉलॉजी लॅबचा आधार घेतला जातो.





