पुणे जिल्हा : बेल्ह्यात तुफान दगडफेक व हाणामारी

दोन गटांत एकमेकांविरोधात गुन्हा दाखल
बेल्हे – बेल्हे (ता. जुन्नर) येथे दोन गटांत तुफान दगडफेक करत मारामारी झाली. ही घटना बेल्हे गावात गुरुवारी (दि.३०) रात्री नऊच्या सुमारास घडली. दोन्ही गटाच्या तरूणांनी एकमेकांविरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्याकडून समजलेली माहिती अशी, जेवण करून मंदिरात बसण्यासाठी जात असलेल्या २८ वर्षीय तरुणावर ३० जणांच्या जमावाने लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने डोक्यास व पाठीवर जबरी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली.
याबाबत अंकित ज्ञानेश्वर शिरतर (रा. बेल्हे) याने दिलेल्या फिर्याद दिली आहे. १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आकिब बेपारी, मिराज बेपारी, समीर बेपारी यांना अटक केली आहे.
दुसरी फिर्याद हुसेन नजीर बेपारी (रा. बेल्हे) याने दिली आहे. त्याचे चुलते समीर कादर बेपारी हे दुचाकीवरून जात असताना फिरोज इनामदार व अनुष डावखर यांनी त्यांना कट का मारला, असे म्हणत दमदाटी केली. या वादातून हुसेन बेपारी व घरातील सदस्यांना ३१ जणांनी दगडांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत १० ते १५ जणांविरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी प्रशांत जालिंदर भंडलकर, आकाश उर्फ सागर ज्ञानेश्वर शिरतर, गणेश मसु गफले यांना अटक केली आहे. इतरांचा शोध पोलीस पथके घेत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, विनोद गायकवाड, अतिरिक्त राखीव जुन्नर पोलीस दल तैनात केले आहे. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे.





