पुणे जिल्हा : पाटसमध्ये बनावट खतांचा साठा जप्त

१ लाख १७ हजारांची पोती ताब्यात : पाटस पोलिसांची कारवाई
पाटस – कृषी खत निर्मिती प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा. लि. या कंपनीच्या नोंदणीकृत नावाचा व चिन्हाचा बेकायदेशीर वापरून बनावट कृषी खताचा साठा आणि विक्री केल्याप्रकरणी पाटस येथील श्री सिध्देश्वर कृषी सेवा केंद्र चालक संतोष परशुराम ठोंबरे यांच्या ताब्यातील एकूण १ लाख १७ हजारांचे बनावट खत जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
याबाबत प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा. लि. कंपनीचे विक्री अधिकारी वसंत पांडुरंग गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात गुरुवार (दि.१९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी खत निर्मिती प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा. लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, पाटस हद्दीत कंपनीचे प्रोडक्ट असलेले प्लॅन्टो नावाची बनावट खते विकली जात आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बनावट खतांचा साठा व विक्रीची माहिती पाटस पोलीसांना दिली. पोलिसांसोबत पाटस हद्दीतील कुसेगाव मार्गावरील भानोबा विद्यालयाच्या शेजारी असलेल्या श्री.सिध्देश्वर कृषी सेवा केंद्र केंद्रावर छापा टाकला.
यावेळी पोलिसांनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्या दुकानातील खतांची तपासणी केली. त्या ठिकाणी प्रलशर बायो प्रोडक्ट कंपनीने उत्पादन न केलेल्या परंतु कंपनीचे प्रोडक्ट प्लॅन्टो नावाचा वापर केलेल्या खताच्या पिशव्या असल्याचे आढळून आले. न्यू प्लॅन्टो प्लस नावाच्या ५० किलो वजनाच्या प्रत्येकी एक हजार रुपये किंमतीच्या ४८ पिशव्या तसेच २५ किलो वजनाच्या प्रत्येकी ५०० रूपये किंमतीच्या १३८ पिशव्या असा एकूण १ लाख १७ रुपयांचा खताच्या पिशव्या बनावट असल्याच्या आढळल्या आहेत. अधिक तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
आरोपीकडून जीएसटीने खतांची खरेदी
पोलिसांनी बनावट खतांच्या सर्व पिशव्या जप्त करून ताब्यात घेतला आहेत. प्रलशर बायो कंपनीने उत्पादित न केलेल्या परंतु कंपनीचे प्रोडक्ट प्लॅन्टो नावाचा वापर करून बनावट खत निर्मिती करून ग्राहकांची फसवणूक व कंपनीची फसवणूक करण्याच्या हेतूने बनावट खतांची विक्री व साठवून करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने जीएसटीने खतांची खरेदी केली असल्याचे समोर येत आहे. तपासासाठी आरोपीला नोटीस दिली असून लवकरच गुन्ह्याचा उलघडा करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.





