संबंधित हॉस्पिटलला प्रांत अधिकार्यांकडून पत्रातून सूचना राजगुरुनगर – पापळवाडी, पाईट (ता. खेड) येथील श्री कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणार्या महिला भाविकांच्या वाहनाला अपघात झाला होता. या भीषण अपघातामध्ये जखमी झालेल्या महिला व मुलांवरील उपचार खर्च शासन करणार असल्याने कोणत्याही पेशंट कडून बिलाची मागणी करू नये, असे लेखी पत्र उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी उपचार घेत असलेल्या सर्व हॉस्पिटलला दिले आहे. पापळवाडी पाईट येथील 40 महिला घेऊन जाणार्या पिकअप वाहनाचा सोमवारी (दि. 11) भीषण अपघात झाला होता. यात 10 महिलांचा मृत्यू झाला. 4 लहान मुलांसह 30 महिला गंभीर जखमी झाल्या. या सर्व जखमींवर पुणे, भोसरी, चाकण आणि राजगुरुनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व जखमी रुग्णांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. काही रुग्णालयाकडून खर्चाबाबत मागणी होत होती. त्यामुळे त्यांना उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी पत्र काढून सूचना केल्या आहेत. राज्य सरकार उपचाराचा खर्च करणार असल्याने जखमी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान भोसरी येथे साईनाथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी महिला रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष व पाईट जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी भेट घेतली. उपचार करणार्या डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याने अपघातग्रस्त जखमी महिलांवर उपचारात हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना केल्या. याबाबत राज्यसरकारच्या वतीने प्रांत अधिकारी अनिल दौंडे यांचे पत्र डॉक्टरांना देण्यात आले.