पुणे जिल्हा : भीमाशंकरला ऑनलाईन बुकिंग दर्शन सुरु करा

मंचर : श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असून श्रावण महिन्यातील यात्रेनिमित्त देशभरातून लाखो भाविक श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांचा प्रवास, दर्शन, वास्तव्य सुलभ व्हावे यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येतील, असे मंचर विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सोमवार, दि. १ रोजी सांगितले.
श्रीक्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रेच्या पूर्वतयारीसाठी दि.१ रोजी जुन्नर आंबेगाव उपविभाग, मंचर खेडचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य यांची सभा आंबेगाव तालुका तहसील कार्यालय घोडेगाव येथे पार पडली.या आढावा बैठकीला आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय मुरकुटे,
मंचर आगर व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी, देवस्थानचे विश्वस्त दत्तात्रय कौदरे, रवींद्र शिर्के, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष प्रशांत काळे, जिल्हा मंत्री संतोष खामकर, मंचर, प्रखंड मंत्री अक्षय जगदाळे घोडेगाव, कुंदन काळे यांच्यासह मंदिराचे विश्वस्त भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी सांगितले की, श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त भीमाशंकर येथे येत असतात.
घोडेगाव मार्गे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, वाहन स्थळापासून देवस्थानकडे जाण्यासाठी प्रवाशांना तात्काळ गाड्या उपलब्ध होतील. यासाठी नियोजन करण्यात यावे, तसेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या परिसरात पाऊस पडत असल्याने पोलीस प्रशासन पोलीस कर्मचाऱ्यांना अनेकदा पावसात भिजावे लागते. त्यामुळे प्रवाशांबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांनाही वाहन स्थळ ठिकाणी निवाऱ्याची सोय व्हावी, अशी मागणी भालेकर यांनी केली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या रांगा लागतात. याचा मोठा परिणाम प्रशासनावर होतो. प्रशासनाचा ताण कमी करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग दर्शन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.





