पुणे जिल्हा : रेडा समाधी मंदिरात धान्य उगवणीचा शुभारंभ

दोन वर्षांपासून खंडीत झाली होती परंपरा
बेल्हे – आळे (ता. जुन्नर) येथील श्रीक्षेत्र रेडा समाधी मंदिरात धान्य उगवणीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. पूर्वी आपल्या भागात उगवणी (धान्य) गोळा करण्याची परंपरा होती, आपल्या जुन्या रूढी परंपरा नुसार आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधव दिवाळीनंतर आपल्या शेतात जे धान्य पिकायचं ते खळ्यामध्ये आणून त्यावर मळणी करून झालेल्या धान्यामधून एक पायली,
आधुली (माप) त्यावेळी आपण देवासाठी काढून ठेवत असायचो पहिलं दान देवाला मग बाकी सर्वांना पहिले दान देवाला दिलं की आपल्या धन धान्यात भरभराट व्हायची अशी इच्छा मनात असायची, व त्यामुळे सर्व ग्रामस्थ ही पद्धत अवलंबत होते.
त्यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे सेवेकरी घरोघरी जाऊन जे धान्य आपण देवासाठी काढून ठेवायचो ते घेऊन जात असत व देवस्थानच्या वतीने त्या कुटुंबाला श्री माऊलींचा प्रसाद घरपोच करत असत, तसेच हे गोळा झालेल्या धान्य (उगवणी) यातून देवस्थान मध्ये असलेले सर्व पुजारी व सेवेकरी यांचा उदरनिर्वाह चालत होता,
कित्येक वर्षे ही परंपरा चालू होती, मधल्या काळात देवस्थानचे सेवेकरी मच्छिंद्र महाराज गावडे हे स्वतः सायकलवर, रिक्षामधून आळे, संतवाडी, कोळवाडी या गावात जाऊन (धान्य) उगवणी गोळा करत होते; परंतु दोन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झाल्यापासून ही परंपरा खंडित झाली होती, परंतु नव्याने आलेल्या विश्वस्त मंडळाने ही उगवणीची परंपरा पुन्हा चालू करण्याचे ठरवले असून तिन्ही गावातील भागाभागामध्ये वाहन (टेम्पो) पाठवून उगवणी (धान्य) गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच श्री ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे वाहन आपल्या भागात आल्यावर गहू, बाजरी, तांदूळ, भुईमुगाच्या शेंगा, सोयाबीन, मठ, हुलगे, हरभरा व इतर असणारे शेतातील धान्य द्यावे व या पुण्य अशा महायज्ञामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले आहे.





