Pune District : श्रीनाथ म्हस्कोबा, देवी जोगेश्वरीस बांधली दहीभाताची पूजा

आषाढ अमावस्यानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
परिंचे – श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे आषाढ अमावस्यानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना भाविकांच्या वतीने दहीभात पूजा बांधण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. गुरुवारी (दि. 24) पावसाची रिमझिम सुरू झाल्याने समाधानकारक पाऊस पडण्यासाठी भाविकांच्या वतीने देवाला प्रार्थना करण्यात येत होती.
अमावस्येच्या निमित्ताने 4.30 वाजता पहाट पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी 6 वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी 10 वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या.
देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता. दुपारी 12 वाजता देवाची धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी 1.15 मि. गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विठ्ठल धुमाळ, राम धुमाळ, सुशीलकुमार जाधव यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सचिव काशिनाथ धुमाळ, खजिनदार अमोल धुमाळ, विश्वस्त सुनील धुमाळ, विराज धुमाळ,श्रीकांत थिटे, बाळासाहेब समगीर, प्रमिला देशमुख, अलका जाधव, जयवंत सोनवणे व सल्लागार मंडळ उपस्थित होते.





