Pune District : भोर शहरातील चौका, चौकात शिवज्योतीने पेटल्या मशाली

भोर : भोर शहरासह ग्रामीण भागात जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने ऐतिहासिक मावळ परिसर दुमदुमून गेला होता. तर भोर शहरातील मंडळांनी चौका चौकात शिवज्योतीच्या मशाली पेटवून शिवजयंतीच्या उत्सवाला रंग भरला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवार (दि.१९) पहाटे पासून तालुक्यातील रायरेश्वर, रोहिडेश्वर (विचित्रगड), केंजळगड किल्ल्यावरून शेकडो शिवज्योती मार्गस्थ होताना सह्याद्रीच्या डोंगर रांगा महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेल्या होत्या.
भोर शहरातील चौपाटी येथील श्री शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ शिवज्योतींचे पूजन करत शिवप्रेमींकडून महाराजाना वंदन केले जात होते. भोर शहरातील एस टी स्टँड, चौपाटी शिवभूमीवरील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा परिसर भोर नगरपालिलेच्या वतीने स्वच्छ करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या वतीने भव्य अशी छञपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली होती.
दरम्यान भोर शहरासह,खेडेगावातून भव्य मिरवणुका, शिवचरित्र वाचन, महाप्रसाद , कीर्तन, पोवाडे, मर्दानी खेळ असे विविध कार्यक्रम करून उत्साहाने महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शासकीय कार्यालयातून, ग्रामपंचायत, शाळा महाविद्यालय मध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक सहशिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.




