पुणे जिल्हा : भोर तालुक्यामध्ये क्रीडा संकुल उभारणारच-आमदार शंकर मांडेकर

कापूरहोळ – ग्रामीण भागातून खेळाडूंना संधी दिल्यास तालुक्यातून चांगले खेळाडू निर्माण होतील. खेळाडूंना प्रोत्साहन बरोबरच आवश्यक मदत केली पाहिजे. भोर कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय खेळाडू तालुक्यातून निर्माण होतील यात शंकाच नाही. तालुक्यातील खेळाडूंसाठी भोर तालुक्यामध्ये क्रीडा संकूल उभारणारच, असे प्रतिपादन भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी केले.
एकलव्य क्रीडा संस्थेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आळंदे तालुका भोर येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे बक्षीस वितरण आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी आमदार मांडेकर बोलत होते. यावेळी स्पर्धेसाठी भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य व भोर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे,
भोलावडे गावचे सरपंच प्रवीण जगदाळे, भोर तालुका राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष केतन चव्हाण, अंकुश अण्णा चव्हाण, पांडुरंग बाठे, केंजळ गावचे सरपंच अजय बाठे, उपसरपंच किरण येवले, वागजवाडीचे सरपंच गणेश आवाळे, युवा कार्यकर्ते लहू साळुंखे, राजेंद्र बापू बांदल आदी उपस्थित होते.
एकलव्य करंडक २०२४ स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी गजराज एंटरप्राईजेस ठरला. तर द्वितीय क्रमांक आझाद वॉरियर्स व तृतीय क्रमांक हिंदवी वॉरियर्सने पटकवला.स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून साहिल बरदाडे, उत्कृष्ट चढाईपट्टू आनंद बंडी, उत्कृष्ट डिफेंडर विशाल ढोणे हे ठरले.





