शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूर, सणसवाडी व कोरेगाव भीमा परिसरात पानशॉपवर गुंगीकारक पदार्थ टाकून पान बनवले जात असल्याने शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकत पान मसाले व पावडर जप्त केले.
शिक्रापूर हद्दीमध्ये शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा परिसरात शैक्षणिक क्षेत्राच्या परिसरामध्ये पानशॉपवर नशा व गुंगीकारक पद्धतीचा मसाला टाकून पान बनवले जात असून युवकांमध्ये त्याचे जास्त आकर्षण आहे.
शाळकरी व महाविद्यालयीन युवके मोठ्या प्रमाणात या पानांच्या आहारी गेलेले असताना हे पान धोकादायक होऊ शकत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस नाईक अतुल पखाले व कृष्णा व्यवहारे यांनी सणसवाडी येथील श्री सिद्धेश्वर पान शॉप, जय मल्हार पान शॉप, सिद्धेश्वर 27 पान शॉप कोरेगाव भीमा येथील जय मल्हार पान शॉप, एस. के. पान शॉप, शिक्रापूर गावातील जय मल्हार पान शॉप, मोरया पान शॉप, जयवर्धन पान शॉप येथे छापे टाकत पाहणी केली.
पान शॉपमध्ये कोणतेही नाव अथवा लेबल नसलेले प्रतिबंधित पान मसाले व पावडर वापरुन पान बनवले जात असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, पोलिसांनी सर्व पान शॉपमधील पान मसाले व पावडर जप्त केली असून त्यांचे नमुने अन्न व औषध विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्या पावडरमध्ये प्रतिबंधित पान मसाला किंवा गुंगीकारक पदार्थ आढळून आल्यास सर्व पान शॉप चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.