पुणे जिल्हा : कार्तिकी यात्रा पूर्व तयारीला वेग

आळंदीतील दर्शनबारीची अधिकार्यांकडून पाहणी
आळंदी – कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 728वा संजीवन समाधी सोहळा 10 दिवसांवर आला आहे. 26 नोव्हेंबरला भागवत एकादशी आळंदी यात्रा तर 28 नोव्हेंबरला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे.
दरवर्षी या यात्रेसाठी लाखावर भाविक येत असतात. त्या दृष्टीने वारकर्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. नगरपरिषदेकडून शहरात वॉच टॉवर, पोलीस मदक कक्ष उभारणी, सीसीटीव्ही बसवणे सुरु आहे. ड्रेनेज लाइन सफाई, दर्शनबारी जागेवर आवश्यक ठिकाणी भराव टाकण्यात आला आहे.
पुरामुळे वाहून गेलेले भक्ती सोपान पुलाचे संरक्षक रेलिंग नव्याने बसवण्यात आलेत. मंदिर प्रशासनाकडून दर्शनबारी मंडप उभारणीचे काम सुरु आहे. शनिवार (दि. 16) आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, दिघी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी दर्शनबारीची पाहणी केली.





