Pune District : अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांत नवचैतन्य

माऊलींचा रिंगण सोहळा माळशिरस येथे उत्साहात
माळशिरस – श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने माळशिरस परिसरात नवचैतन्य निर्माण केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि माऊलींच्या नामजपाने आसमंत व्यापून टाकणाऱ्या रिंगण सोहळ्याने लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पुरंदावडे येथील हद्दीत अश्वांनी नेत्रदीपक दौड करत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. सायंकाळी हा सोहळा माळशिरस येथे मुक्कामी विसावला. उद्या, २ जुलै रोजी, हा सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ होईल.
पहाटे कर्ण वाजताच वारकऱ्यांनी पालखी तळावर गर्दी केली. प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी माऊलींच्या तंबूत नैमित्तिक पूजा केली. टाळ आणि वीणेच्या झंकारीत काकडा आरती झाली. पवमान पूजा आणि माऊलींच्या पादुकांची आरतीनंतर पादुका पालखीत विराजमान झाल्या. माऊलींच्या जयघोषात खांदेकऱ्यांनी पालखी खांद्यावर उचलली आणि सकाळी ६:३० वाजता सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ झाला. ढगाळ वातावरणात वैष्णवांनी पंढरीची वाट धरली. सकाळी ८:३० वाजता सोहळा मांडवे ओढा येथे पोहोचला, जिथे माऊलींना नैवेद्य दाखवला गेला आणि वारकऱ्यांनी दुपारचे भोजन उरकले.
अडीच तासांच्या विश्रांतीनंतर सकाळी ११ वाजता सोहळा पुरंदावडे गावच्या हद्दीकडे रवाना झाला. सदाशिवनगर, पुरंदवडे येथे ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी १२:३० वाजता माऊलींचे अश्व आणि १ वाजता लाखो वैष्णवांसह पालखी सोहळा पुरंदावडे येथे पोहोचला. रिंगणासाठी २७ रथापुढील आणि २० रथामागील, अशा ४७ दिंड्या रिंगणस्थळी दाखल झाल्या. पोलिस आणि आळंदी देवस्थान कर्मचाऱ्यांनी आखीव रेखीव रिंगण तयार केले होते.
मध्यभागी पालखीसाठी छोटा मंडप उभारला गेला. दुपारी १:१० वाजता रिंगण सोहळ्यास सुरुवात झाली. जरीपटक्याच्या भोपळे दिंडीच्या ध्वजाने दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या माऊली आणि स्वाराच्या अश्वांना रिंगणात सोडले. स्वाराचा अश्व, माऊलींच्या अश्वाने नेत्रदीपक दौड करत तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. लाखो भाविकांनी माऊलींच्या जयघोषात हा सोहळा डोळ्यात साठवला.
रिंगणानंतर दिंड्यांमध्ये हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी असे खेळ रंगले. टाळ-मृदुंगाच्या साथीने नादब्रह्माचा उडीचा खेळ रंगला, वारकरी तल्लीन झाले होते. सोहळा येळीव येथे अर्ध्या तासासाठी विसावला आणि सायंकाळी समाजआरतीनंतर माळशिरस येथे मुक्कामी विसावला. उद्या सकाळी सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ होईल, वाटेत खुडूस फाटा येथे गोल रिंगण, धावा आणि मानाचे भारूडाचे कार्यक्रम होऊन सोहळा वेळापूर मुक्कामी विसावेल.





