पुणे जिल्हा : वेल्डिंगच्या ठिणगीने उसाच्या पाचटाला आग

अंदाजे 20 लाखाचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी नाही
नारायणगाव – वारुळवाडी (ता.जुन्नर) येथील अभिषेक विलास भुजबळ यांच्या सर्वे नंबर 62 येथील अर्बन फार्म्स येथे मंगळवारी (दि.21) सकाळी 10.30 च्या सुमारास उसाच्या पाचटापासून कंपोस्ट कल्चर खत तयार होणार्या उसाच्या पाचटाला आग लागली होती.
सुदैवाने कोणतीही जीविहानी झाली नाही. कंपनीच्या स्टॉक तयार करून ठेवलेल्या उसाच्या पाचटाला शेतात वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडाल्याने आग लागल्याची घटना घडली असून त्यामध्ये अंदाजे 20 लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
उसाच्या पाचटाला लागलेल्या आगीने मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण केले होते. घटनास्थळी उपस्थितांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. वारूळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ, भरत मुठे, नारायण भुजबळ, सुरज भुजबळ, कुणाल भुजबळ, अंबादास भुजबळ, अभिषेक भुजबळ, वैभव भुजबळ यांनी वेळीच मोटारपंप सुरू केल्याने मोठा अनर्थ टळला.
यावेळी गगन वॉटर सप्लायरचे आकाश कानस्कर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसुरक्षा रक्षक दल, जवान आदित्य डेरे, गुरुप्रसाद टँकरचे मंगेश पाटे यांच्या टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. वाळलेला पाचटाचा भाग अजूनही धुपत आहे. यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक गाडीची मदत झाली आहे.





