Pune District : सोपानकाकांच्या पालखी सोहळा भक्तिमय

सोमेश्वरच्या प्रांगणात पालखी सोहळा विसावला
सोमेश्वरनगर – श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा गुरुवार (दि.२६) उत्साही वातावरणात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात विसावला. सकाळी दहाच्या सुमारास हा भव्य सोहळा निंबूत येथून मार्गस्थ झाला.
यावेळी निंबूत छपरी येथे पालखी न्याहारीसाठी थांबली असता उपसरपंच अमर काकडे, सोसायटीचे चेअरमन शरद फरांदे व ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे स्वागत केले.
वाघळवाडीतील अंबामाता मंदिर येथे पालखी विसाव्यासाठी ठेवली. यावेळी ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात, दुतर्फा रांगोळ्यांनी सजवलेली वाट, नीरा रस्त्यावर उभारलेल्या स्वागत कमानींनी भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. याप्रसंगी वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार संकुडे, सतीश सकुंडे गणेश जाधव, अविनाश सावंत, विजय सावंत,अजिंक्य सावंत, बबलू सकुंडे, ग्रामविकास अधिकारी संजयकुमार भोसले उपस्थित होते.
दुपारी पालखी सोहळा काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रथम अश्वरिंगणासाठी दाखल झाला. यावेळी सोपानकाकांच्या पादुकांचे प्रथम रिंगण पार पडले. मानाच्या अश्वाने दोनवेळा रिंगण पूर्ण केले. यावर्षी पहिल्यांदाच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भक्तिभावाने रिंगण पूर्ण केले. यावेळी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिलांनी रिंगणात सहभाग घेत भक्तिभावाने रिंगण पूर्ण केले. हा अनुपम सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
पालखी सोहळ्यात जवळपास दीड लाख वारकरी सहभागी झाले. साई सेवा हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, औषधोपचार, अल्पोपाहार वाटप करण्यात आला. सायंकाळी पालखी सोहळा सोमेश्वर कारखान्याच्या प्रांगणात विसावली. यावेळी सोहळा प्रमुख त्रिभुवन महाराज गोसावी यांचा कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, माजी सभापती प्रमोद काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, रमाकांत गायकवाड, डॉ. देवीदास वायदंडे, डॉ. जगनाथ साळवे, संचालक ऋषिकेश गायकवाड, लक्ष्मण गोफणे, माजी सभापती निता फरांदे, अधिकारी कालिदास निकम, राजू धुर्वे आदी मान्यवरांनी स्वागत केले.





