‘लालफिती’त अडकलेला पाणीप्रश्न सोडवा

खासदार डॉ. कोल्हे ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी
नारायणगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील जुन्नर तालुक्यातील कोपरे, मांडवे, जांभूळशी, मुथाळणे अदिवासी गावांना लालफितीच्या व दिरंगाईच्या कारभाराची बसत असलेली झळ कायमस्वरूपी दूर करून पाणी प्रश्न कायमचा सोडवावा, यासाठी शासन दरबारी माझे महसूल, अर्थ, नियोजन, जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांची स्वतंत्र बैठक आयोजित करून सुरू असलेल्या प्रयत्नांना साथ देण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैलगाडा शर्यतींना आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्यासाठी प्रेक्षक गॅलरी उभारून बैलगाडा घाटाला स्टेडियमचे स्वरूप देण्यात यावे, बैलांना पाणी, निवारा आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना कराव्यात.
गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या चौफुला-केंदूर-पाबळ रस्त्याच्या कामास गती मिळावी. सर्वसामान्यांना सर्व आजारांवर माफक
दरात उपचार देणाऱ्या इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पास तात्काळ मंजुरी देण्यात यावी.
नमामि इंद्रायणी नदी सुधार योजना राबवावी
किल्ले शिवनेरीच्या वाहनतळापासून पायथ्यापर्यंत जाण्यासाठी कुसुर ग्रामपंचायत आणि शिवाईमाता ट्रस्टने दोन 24 सीटर इलक्ट्रिक बससाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर करावा. आषाढी, कार्तिकी वारीसह दर महिन्याला एकादशीला श्रीक्षेत्र आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांचा इंद्रायणी नदी श्रद्धेचा विषय असल्याने इंद्रायणी नदीत झालेले प्रचंड प्रदूषण रोखण्यासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि इंद्रायणी नदी सुधार योजना राबवावी अशा प्रकारच्या विविध कामांची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली.





