पुणे जिल्हा : बिबट्यापासून सुरक्षेसाठी सौर कुंपण

जुन्नरचे उपवनसंरक्षक सातपुते : नगदवाडीत एक दिवसीय कार्यशाळा
नारायणगाव – जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यात मानवावर बिबट्यांची वाढते हल्ले लक्षात घेऊन बिबट्यापासून सुरक्षेसाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने एकाट्या घरगोठ्याभोवती सौर कुंपण उभे करण्यात येणार आहे.
जुन्नर वन विभागातील कांदळी, नगदवाडी (ता. जुन्नर) येथे उभारण्यात आलेल्या बेस कॅम्पमध्ये जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून शनिवारी (दि. 9) सौर कुंपण उभारणीबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनपरिक्षेत्र जुन्नर, ओतुर परीक्षेत्रा मधील अधिकारी, कर्मचारी तसेच बिबट रेस्क्यू टीम सदस्य उपस्थित होते. कार्यशाळेत शेतकर्यांना सौरकुंपन उपकरणाबाबत अधिकाधिक माहिती मिळावी व शंकेचे समाधान व्हावे यासाठी संकल्प दर्डा, संदेश दर्डा यांच्या मार्फत वनपाल, वनरक्षक, वनमजूर व रेस्कू टिमला ट्रेनिंग देण्यात आले आहे. यामध्ये विशेष करून झटका मशीन, बॅटरी, सौरऊर्जा प्लेट व सौर कुंपण कशा पद्धतीने कार्य करते याबाबत माहिती देण्यात आली. उपकरण वापरताना घ्यावयाची काळजी व दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील वाढती बिबट समस्या लक्षात घेऊन ज्या ठिकाणी एकांतात घरे आहेत तेथील माणसांना बिबट्यापासून सुरक्षित उपाय योजना म्हणून सौर कुंपणाचा वापर करण्यात येत आहे. सौर कुंपणामध्ये विशिष्ट क्षमतेचा इलेक्ट्रिक करंट सोडण्यात येत असून कुंपणाच्या तारेला प्राण्यांचा स्पर्श झाला तर जोरात झटका बसतो. त्यानंतर पुन्हा तो प्राणी त्या ठिकाणी येत नाही.
घराभोवती कुंपण उभारताना ठराविक अंतरावर खड्डे खोदून खांब लावण्याचे काम कुटुंबाला करावे लागणार आहे. याबाबतची संपूर्ण तांत्रिक माहिती वन विभागामार्फत दिली जाईल. बिबट पासून संरक्षण मिळवण्यासाठी सौर कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतच्या ग्रामसभा ठरावमध्ये एकांतात असलेल्या घरमालकाचे नाव, सौर कुंपण बसवणे याबाबत उल्लेख असणे आवश्यक आहे. सौर कुंपण कार्यान्वित झाल्यानंतर त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कुटुंबाची राहील असे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.
कार्यशाळेत जुन्नर सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरीक्षेत्र अधिकारी ओतुर लहू ठोकळ तसेच जुन्नर, ओतुर वनपरीक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर व रेस्कू सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
75 टक्के अनुदान मिळणार
जुन्नर तालुक्यातील एकांतात असलेल्या घराला सौर कुंपण बसवले गेले तर घरातील कुटुंब बिबट्यापासून सुरक्षित होणार आहे. सौर कुंपण बसविण्यासाठी 30 हजार किमतीच्या उपकरणाचा उपयोग केला जातो. उपकरणासाठी 75 टक्के अनुदान कुटुंबाला देण्यात येणार असून 25 टक्के रक्कम कुटुंबाने भरवायची आहे.





