Pune District : संततधार पावसामुळे सापांचा वावर वाढला

पेठ : सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तापमान प्रचंड वाढलेले आहे. मात्र, संततधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या वातावरणात साप मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता वाढते. घराजवळील गारव्याच्या ठिकाणी किंवा जिन्याखाली साप सहज आसरा घेऊ शकतात. शिवाय मे महिना हा सापांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे साप बिळाबाहेर बाहेर पडण्याची शक्यता वाढते. अशावेळी त्यांना मारू नका, सर्पमित्रांना बोलावून पकडून जंगलात सोडून द्या, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
विषारी आणि बिनविषारी साप यातील फरक माणसाला ओळखता आला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने नाग घोणस मणियार या सापाच्या विषारी जाती आढळून येतात. पैकी घोणस ग्रामीण भागामध्ये आता सर्रास आढळून येतो. घराच्या आजूबाजूस साप दिसल्यास सर्पमित्रांना बोलवा शक्यतो त्यांच्या जवळ न जाता ठराविक अंतर ठेवावे, तीव्रवासाच्या वस्तूंपासून साप दूर राहतात. मग त्यामध्ये केरोसीन, पेट्रोल, कांदा व लसूण या गोष्टींपासून साप लांब राहण्याचे प्रयत्न करतो.
साप दिसला की तो मारायचा.. हे सर्वसामान्य लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे. साप म्हणजे शत्रू, हीच शिकवण पिढ्या न् पिढ्या मिळाली आहे. साप ही जमात मानवी अप्रचाराने बदनाम झाली आहे. विषारी साप कुठला आणि बिनविषारी कुठला, हे ओळखता न आल्याने माणूस घाबरतो. त्याच्या या अज्ञानातूनच सापांवर वार केले जातात. सापांच्या जाती ओळखता न आल्याने सुद्धा अनेक जणांचा जीव जातो.
साप म्हटलं की त्या पाठोपाठ येते भीती आणि अंधश्रद्धा. या कारणांमुळेच साप दिसला की ठेचला जातो, असे हजारो साप महाराष्ट्रात रोज मारले जातात. हे पाहून असं वाटतं की आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारायचे काम करतो. सापा हा शेतकऱ्यांचा मित्र आहे साप दिसल्यावर मारू नका.
– विलास भोर, सर्पमित्र, वळती (ता.आंबेगाव)सर्पदंशाने व्यक्ती घाबरून जाऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीला शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. सर्प चावलेल्या ठिकाणी सूज येऊ शकते त्यामुळे कपडे आणि दागिने काढून ठेवणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी जखमेवर बर्फ चोळू नये. चावलेल्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध लावू नये. चावलेली जागा कापू नये.
-डॉ. तुषार पाटोळे, पेठ





